दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाबाबत पश्चिम बंगालमधील राजकारण अजून शांत झाले नव्हते की, आता आणखी एका हिंदी चित्रपटाने तिथे वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. आता 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' चित्रपटाचा दिग्दर्शक सनोज मिश्रा पश्चिम बंगाल पोलिसांच्या निशाण्यावर आला आहे.
बंगाल पोलिसांनी दिग्दर्शकावर राज्याची बदनामी केल्याचा आरोप करत त्याच्याविरोधात नोटीस बजावली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, पश्चिम बंगाल पोलिसांनी 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल'च्या दिग्दर्शकाला नोटीस बजावली आहे. या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक बंगालची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पश्चिम बंगाल पोलिसांनी केला आहे.
'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल'चे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना 30 मे रोजी पश्चिम बंगालच्या एमहर्स्ट स्ट्रीट पीएस येथे चौकशीसाठी CrPC च्या कलम 41A अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. या चित्रपटाबाबत आयपीसी, आयटी अॅक्ट आणि सिनेमॅटोग्राफी अॅक्टच्या विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आता या प्रकरणाचे पुढे काय होते ते पाहावे लागेल, सध्या या नोटिशीला उत्तर देताना दिग्दर्शकाने बंगाल पोलिसांना एक महिन्याची मुदत देण्याची विनंती केली आहे.
दुसरीकडे, दिग्दर्शकाने त्यांच्या फेसबुकवर एका लांबलचक पोस्टद्वारे पंतप्रधान मोदींना मदतीची विनंती केली आहे. माझ्या 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' या चित्रपटाच्या ट्रेलरच्या आधारे बंगालमध्ये माझ्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे, मला अटक करून तुरुंगात मारले जाऊ शकते, मी फक्त चित्रपट केला आहे, मी कोणताही गुन्हा केलेला नाही. सत्य बोलल्याबद्दल माझा छळ केला जात आहे.
वसीम रिझवी फिल्म्सच्या बॅनरखाली बनत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती नारायण सिंग यांनी केली आहे. 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचा दावा करण्यात आला आहे.