दर गुरुवारी टीआरपी रेटिंगचा चार्ट येतो आणि प्रेक्षकांचा कल काय आहे, ते कळतं. याही वेळी एक मोठा बदल टीआरपीमध्ये झालाय. एका नव्या मालिकेचा प्रवेश झालाय.
पाचव्या स्थानावर आहे मिसेस मुख्यमंत्री मालिका. मी मिरवणार सगळ्यांची जिरवणार म्हणत या मिसेस मुख्यमंत्रीनं सगळ्यांची मनं जिंकलीयत. अमृता धोंगडेची सुमी सध्या खूपच चर्चेत आहे. पूर्ण नवीन कलाकारांना घेऊन या मालिकेनं पहिल्या पाचात स्थान मिळवलंय. गेल्या वेळी 5वी असलेली अग्गबाई सासूबाई या वेळी पहिल्या पाचात नाही.
चला हवा येऊ द्या शेलिब्रिटी पॅटर्न चौथ्या नंबरवर आहे. यात प्रेक्षकांना डबल ट्रीट मिळते. नेहमीच्या कलाकारांची धमाल तर पाहायला मिळतेच, शिवाय मालिकांमधले कलाकार येऊन शेलिब्रिटी पॅटर्न सादर करतात. त्यानं रंगत आणखी वाढते.
टीआरपी रेटिंगमध्ये पुन्हा एकदा झी मराठीच आहे. स्टार प्रवाह, कलर्स मराठी यांनी पहिल्या पाचात नंबर पटकावला नाहीय.
तिसऱ्या स्थानावर आहे 'स्वराज्यरक्षक संभाजी'. गेल्या वेळी ही मालिका चौथ्या स्थानावर होती. म्हणजे बढती मिळाली. सध्या कोंडाजी सिद्धीच्या जंजिऱ्यात आहेत. शंभूराजेंची ही खेळी प्रेक्षकांचा मालिकेतला रस आणखी वाढवतेय.
दुसरा नंबर गेल्या वेळचाच आहे. माझ्या नवऱ्याची बायको याही वेळी नंबर 2वरच आहे. कधी काळी सतत नंबर 1 राहणारी ही मालिका, आता तिचं स्थान घसरलंय. कारण फार वेगळं काही पाहायला मिळत नाहीय.
राणादानं मात्र नंबर 1 काही सोडला नाही. याही वेळी तुझ्यात जीव रंगला मालिका 1 नंबरवर आहे. प्रेक्षकांचा राणादामध्ये जीव रंगलाय अजून. राणादाचा बदललेला सूर आणि नूर प्रेक्षकांना आवडतोय. झी मराठीवर दोन नव्या मालिका सुरू होतायत. भागो मोहन आणि अल्टी पल्टी. एकूणच स्पर्धा वाढतेय.