दर आठवड्याला टीआरपी रेटिंगचे आकडे येतात आणि कुठल्या मालिकेकडे प्रेक्षकांचा कल आहे हे समोर येतं. या वेळचं टीआरपी रेटिंग धक्का देणारं ठरलंय. महत्त्वाचं म्हणजे झी मराठीच्या वर्चस्वाला धक्का लागलाय.
गेले दोन आठवडे पाचव्या स्थानावर चला हवा येऊ द्या हा शो आहे. पण यावेळी अनेक आठवड्यांनी पहिल्या पाचात कलर्स मराठीला स्थान मिळालंय. कलर्स मराठीवरची मालिका बाळूमामाच्या नावानं चांगभलं 5व्या नंबरवर आलीय. संत बाळूमामा यांच्या आयुष्यावर ही मालिका बेतलीय. बाळूमामा लोकांसाठी बरंच कार्य करतात. मालिकेत त्यांचे चमत्कारही पाहायला मिळतायत.
तुला पाहते रे या आठवड्यात संपतेय. त्यामुळे या मालिकेचा प्रेक्षकवर्ग ही मालिका जास्त पाहायला लागलाय. ईशा विक्रांत सरंजामेचा बदला घेणार, त्याला शिक्षा देणार म्हणता म्हणता तिला आता विक्रांतबद्दल हळुवार भावना निर्माण होतायत. विक्रांतही ईशावर खरं प्रेम करतोय. त्याचा कावेबाजपणा गळून पडतोय. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता जास्त वाढतेय. म्हणून ही मालिका चौथ्या स्थानावर आलीय.
दर वेळी TRP चार्टमध्ये फक्त झी मराठीच दिसत असते. पण या वेळी बदल झालाय. पाचव्या नंबरवर कलर्स मराठीनं स्थान पटकावलंय. पण अजून बिग बाॅस मराठी, रात्रीस खेळ चाले मालिका अजून पहिल्या पाचात आले नाहीत.
स्वराज्यरक्षक संभाजी गेल्या वेळेप्रमाणे तिसऱ्या स्थानावर आहे. गेल्या आठवड्यात दरबारात शिक्षा सुनवणं, वाद-प्रतिवाद चांगलेच रंगले होते. डाॅ. अमोल कोल्हेंनी साकारलेले संभाजी महाराज तर लाजवाब, पण कारभारी असोत, येसूबाई असो, सोयरा मातोश्री असो.. आपण इतिहासच पाहतोय, ही भावना प्रेक्षकांची असते. हेच या मालिकेचं यश.
तुझ्यात जीव रंगला मालिकेत आता वेगळी उर्जा आलीय. राणादाचं बदलेलं रूप प्रेक्षकांना आवडलंय. राणादाबरोबर मालिकेचाही मेकओव्हर होतोय. त्यामुळे ही मालिका नंबर 2वर आलीय.
पुन्हा एकदा निर्विवादपणे माझ्या नवऱ्याची बायको नंबर वनच राहिलीय. गेल्या आठवड्यात दर दर भटकणारा केविलवाणा गुरू, शनाया आणि राधिकानं त्याच्याकडे फिरवलेली पाठ याच गोष्टी सुरू राहिल्या आणि प्रेक्षकांना त्या आवडल्या. या मालिकेचं स्थान अबाधितच आहे.