बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला 'पंगा क्वीन' म्हणून ओळखलं जातं. अभिनेत्री सतत विविध विषयांवर आपलं रोखठोक मत मांडत असते. दरम्यान कंगना रनौत पुन्हा एकदा आपल्या ट्विटमुळे चर्चेत आली आहे.
सध्या देशभरात आयपीएलची धूम सुरु आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आयपीएलच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता आयपीएलच्या एका सामन्यादरम्यानची एक गोष्ट कंगना रनौतला खटकली आहे.
नुकतंच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये सामना रंगला होता. यादरम्यान स्टेडियममध्ये एका चिमुकल्याच्या हातात असलेल्या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.
मात्र हा प्रकार कंगना रनौतला अजिबात आवडला नाही. अभिनेत्रीने ट्विट करत याबाबत संताप व्यक्त केला आहे.
या मुलाच्या हातात असलेल्या पोस्टवर असं लिहिण्यात आलं होतं, 'हाय विराट अंकल, मी वामिकाला डेटवर घेऊन जाऊ शकतो का?' हा प्रकार कंगनाला अजिबात पसंत पडला नाहीय.
याबाबत अभिनेत्रीने आता ट्विट करत त्या मुलाच्या पालकांवर जाळ काढला आहे. अभिनेत्रीने लिहलंय, 'आपल्या लहान मुलांना अशा गोष्टी शिकवू नका. हे सगळं करुन तुम्ही मॉडर्न आणि कुल नव्हे तर अश्लील आणि फूल दिसता'.
कंगना रनौतच्या या ट्विटनंतर आता सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.