'बाहुबली' स्टार प्रभास सध्या आपल्या आगामी 'आदिपुरुष' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. परंतु प्रभासचे चाहते त्याला प्रभू श्रीरामच्या अवतारात पाहायला प्रचंड उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रभासचा या चित्रपटातील लुक समोर आला आहे. दरम्यान आज अभिनेता आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे.
आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रभास जगभरात लोकप्रिय झाला आहे. त्याचा अतिशय मोठा चाहतावर्ग आहे. आज अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहते मध्यरात्रीपासूनच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तर काही चाहते अभिनेत्याला प्रत्यक्षात पाहण्यासाठी धडपड करत आहेत.
प्रभासचं पूर्ण नाव व्यंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलापती असं आहे. तो निर्माता यू सूर्यनारायण राजू आणि शिव कुमारी यांचा मुलगा आहे.साऊथचा स्टारकिड असूनसुद्धा प्रभासने आपली स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे.
चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी प्रभासने आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. अभिनेत्याने हैदराबादच्या श्री चैतन्य महाविद्यालयातून बी.टेकची पदवी घेतली आहे. यानंतर त्याने 2002 मध्ये ईश्वर या तेलुगु चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभासने 'आदिपुरुष' साठी तब्बल 100 कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जातं. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीय. परंतु सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा होत असते.
प्रभास अनेक ब्रॅन्ड्सच्या जाहिरातींमधूनसुद्धा कोट्यावधींची कमाई करतो. प्रभास साऊथ इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यापैकी एक आहे.
प्रभास फारच आलिशान आयुष्य जगतो. त्याच्या चेन्नईमधील घराची किंमत 65 कोटी असल्याचं म्हटलं जातं. सोबतच अभिनेत्याकडे स्कोडा, ऑडी, रोल्स रॉईस, जॅगुआर,बीएमडब्ल्यू अशा अनेक लग्जरी कार आहेत.
टाइम्स नाऊच्या रिपोर्ट्सनुसार, प्रभासजवळ एकूण तब्बल 215 कोटींची संपत्ती आहे.