बॉलिवूडमधील अत्यंत देखणा आणि उत्तम अभिनेता म्हणून जॅकी श्रॉफ यांना ओळखलं जातं. आज अभिनेते आपला ६६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने त्यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टींवर एक नजर टाकूया.
जॅकी श्रॉफ यांचा जन्म १ फेब्रुवारी १९५७ साली महाराष्ट्रातील लातूर या शहरातील उद्गीर याठिकाणी झाला होता. त्यांचे वडील गुजराती तर आई कझाकिस्तानी होत्या.
जॅकी श्रॉफ यांचं बालपण मुंबईतील मालाबर हिल्स जवळच्या तीन बत्ती इलाक्यात गेलं. अनेकांना माहिती नसेल जॅकी श्रॉफ यांचं खरं नाव जयकिशन असं आहे. मात्र सिनेमांमध्ये त्यांना जॅकी अशीच ओळख मिळाली आहे.
जॅकी श्रॉफ हे आपल्या चाळीतील एक गुंड होते त्यांना लोक जग्गू दादा असं म्हणत असत. परंतु ते गरीब, गरजू लोकांच्या हक्कासाठी लढत असत.सांगायचं झालं तर जॅकी श्रॉफ यांचे मोठे भाऊ याठिकाणचे गुंड होते. ते सर्वांच्या हक्कासाठी पुढे येत असत.
एकेदिवशी एका व्यक्तीला बुडताना वाचविण्यासाठी त्यांनी पाण्यात उडी घेतली परंतु त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांनतर जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या भावाची जागा घेत लोकांनां मदत करायला सुरुवात केली.
एकदा जॅकी श्रॉफ अभिनेते देवानंद यांच्या सिनेमाचं शूटिंग पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी देवानंद यांनी त्यांना पाहिलं. आणि त्यांनी जॅकींना एक छोटासा रोल ऑफर केला. अभिनेत्याने तो मान्य केला. आणि अशाप्रकारे त्यांनी 'स्वामी दादा' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
परंतु खऱ्या अर्थाने त्यांचा अभिनेता म्हणून पहिला सिनेमा 'हिरो' होता. सुभाष घईंनी त्यांना हा सिनेमा ऑफर केला होता. त्यांनीच जयकिशन हे नाव बदलून जॅकी असं केलं होतं.
जॅकी श्रॉफ यांचा 'हिरो' हा सिनेमा सुपरहिट ठरला. आणि त्यांनतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.