अभिनेते केदार शिंदे सध्या त्यांच्या बाईपण भारी देवा या सिनेमामुळे चर्चेत आहेत. बाईपण भारी देवा सिनेमानं 65 कोटींची दमदार कमाई केली आहे.
मराठी सिनेसृष्टीला आणखी भरारी घेण्यासाठी केदार शिंदे यांच्या बाईपण भारी देवा या सिनेमानं मोलाची कामगिरी केली आहे.
दरम्यान केदार शिंदे यांनी मला राजकारणात जायचं आहे, असं स्पष्ट मत मांडलं आहे. मटाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राजकारणात जाण्यामागचं कारण देखील सांगितलं आहे.
केदार शिंदे म्हणाले, "मला राजकारणात जायचं आहे. मनोरंजन सृष्टीतील कामातून मी माझ्या घराला आर्थिक स्थैर्य आणेन आणि नंतरच राजकारणात जाईन".
"मी राजकारणात जाईल ते उदरनिर्वाहासाठी नाही तरी सांस्कृतिकदृष्ट्या सकारात्मक काम करण्यासाठी जाईन. राज ठाकरे यांनी मला माझ्या पडत्या काळात साथ दिली. आज त्या माणसाबरोबर मला उभं राहायचं आहे", असं त्यांनी म्हटलं आहे.
त्याचप्रमाणे "सध्याच्या राजकारणावर भाष्य करण्याची माझी इच्छा नाही. पण आपण नेहमीच कुंपणावर बसून बोलतो. आता कुंपण ओलांडून मैदानात येण्याची वेळ आहे. त्यामुळे मला काही बोलण्याचा अधिकार नाही", असही केदार शिंदे म्हणाले.
केदार शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर ते आज ना उद्या राज ठाकरेंच्या मनसे पक्षात प्रवेश करतील हे स्पष्ट झालं आहे.
केदार शिंदे आणि राज ठाकरे यांचे अनेक वर्षांचे सलोख्याचे आणि मैत्रिचे संबंध आहेत. दोघेही एकाच शाळेत शिकत होते.
केवळ केदार शिंदे नाही तर त्यांचे आजोबा शाहीर साबळे यांच्याशी देखील ठाकरे घराण्याचं फार जिव्हाळ्याचं नातं आहे.