'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय शो आहे. मात्र हा शो नेहमीच स्पर्धकांच्या वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत असतो. नुकताच 'बिग बॉस मराठी' च्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. यामध्ये एकूण १५ स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे. हे १५ स्पर्धक येत्या १०० दिवसांसाठी एकत्र राहणार आहेत.
घरात नुकताच सर्वांच्या एकेमकांसोबत ओळखी होऊ लागल्या आहेत. दरम्यानच 'येऊ कशी तशी...' फेम मोमो अर्थातच अभिनेत्री मीरा जग्गनाथ सर्वांशी पंगा घेताना दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी मीराने टॉवेलच्या मुद्द्यावरून स्प्लिट्सविला फेम जय दुधानेसोबत कडाक्याचं भांडण केलं होतं. त्यामुळे पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचं मनोरंजन झालं होतं.
तर आज दुसऱ्या दिवशीसुद्धा मीराचा पारा चढलेला दिसत आहे. आज मीरा बिग बॉसमध्ये अभिनेत्री स्नेहा वाघसोबत राडा करताना दिसून येणार आहे. मीरा जेवणाच्या विषयावरून स्नेहाशी वाद घालताना प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या स्नेहाची किचनमध्ये ड्युटी आहे. त्यामुळे जेवणाची जबाबदारी तिच्यावर आणि त्याच्या सेवकावर आहे.
मीराने स्नेहाला आपल्याला जेवण कमी पडल्याच सांगत वादाला सुरुवात केली. यामध्ये स्नेहाने तिला इथून पुढे असं होणार नाही याचं आश्वासन दिलं. मात्र मीराचा पारा खूपच चढलेला दिसून येत आहे. ती स्नेहाचं काहीही ऐकून घ्यायला तयार नाहीय. उलट उपाशी ठेवणार का? असा प्रश्न तिने स्नेहाला केला आहे.
मीराच्या या वागण्यावर स्नेहानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. स्नेहा मीराला या सर्वाचं कसं उत्तर देणार. आणि त्यानंतर मीराचं म्हणणं काय असणार हे पाहणं खूपच उत्सुकतेचं असणार आहे.
या आधी मीराने जय दुधानेसोबत ओला टॉवेल बेडवर का ठेवला या मुद्द्यावर राडा केला होता. त्याला उत्तर देत जयही भडकला होता. स्पर्धकांच्या पहिल्याच दिवशीपासून दिसणाऱ्या या धमाक्याने चाहत्यांच मात्र मनोरंजन होत आहे.
तर दुसरीकडे 'देवमाणूस' आणि 'वैजू' फेम अभिनेत्री सोनाली पाटील भावुक होताना दिसत आहे. सोनाली आपल्या वडिलांच्या आठवणीत भावुक झाली आहे. सोनाली 'वैजू' च शूटिंग करत असतानाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. सोनाली कीर्तनकार शिवलीला यांच्याजवळ आपलं मन मोकळं करताना दिसून येणार आहे.
शिवलीला यांनी सोनालीची समजूतदेखील काढली आहे. त्यांनी सोनालीला समजावलं, 'तुझे वडील जिथे असतील तुला पाहून खूप आनंदी असतील. तू आज बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाली आहेस. तुझं यश पाहून त्यांना अभिमान वाटतं असेल'. असं म्हणत शिवलीला यांनी सोनालीची समजूत काढली आहे.