टेरेन्स लुईस भारतीय डान्सर आणि कोरियोग्राफर आहे. आज जगभरात त्याचा चाहतावर्ग आहे. 10 एप्रिल 1975 रोजी मुंबईत जन्मलेल्या टेरेन्सला स्टंटबाजीचीसुद्धा आवड आहे. टेरेन्स हा रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी' सीझन 3 चा मध्ये सहभागी झाला होता. अनेकदा डान्स रिअॅलिटी शोज जज करताना दिसणारा टेरेन्स स्वतःची डान्स अकॅडमी चालवतो आणि भारतात तसेच परदेशात डान्स वर्कशॉपसुद्धा करतो. आज टेरेन्स आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहे.
टेरेन्स लुईसने आपल्या डान्स मूव्ह्सने फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही लोकांची मने जिंकली आहेत. वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी नृत्य शिकलेल्या टेरेन्सने लहानपणी एका नृत्य स्पर्धेत भाग घेत ती स्पर्धा जिंकलीसुद्धा होती. या विजयाने त्याला स्टेजची आवड निर्माण झाली होती. टेरेन्सने 2002 मध्ये अमेरिकन कोरिओग्राफी अवॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
टेरेन्स लुईसला रॉकस्टार बनण्याचं अक्षरशः वेड लागलं होतं. परंतु टेरेन्सच्या वडिलांना आपल्या मुलाने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असे नेहमीच वाटत होते.मात्र नंतर टेरेन्सच्या वडिलांनीहीत्याला 15 वर्षांचा झाल्यावर डान्सवर फोकस करण्याचा सल्ला दिला होता
टेरेन्स लुईसला डान्सच्या प्रत्येक प्रकारात प्रभुत्व मिळवायचे होते, त्यामुळे त्याने कुटुंबापासून लपून-छपून कथ्थक शिकण्यास सुरुवात केली होती.
टेरेन्सने आपला खर्च भागवण्यासाठी डान्स शिकवायला सुरुवात केली. त्यातून त्याला चांगली कमाई होत असे. परंतु टेरेन्सने डान्समधूनच पैसा कमावला नाही तर त्याने फिटनेस इन्स्ट्रक्टर म्हणूनही काम केलं आहे.
टेरेन्स लुईसने माधुरी दीक्षित, सुष्मिता सेन्स, बिपाशा बसू, सुजैन खान याशिवाय शाहरुख खानची पत्नी गौरी खान यांच्यासाठी फिटनेस इन्स्ट्रक्टर म्हणून काम केलं आहे.
आमिर खानच्या 'लगान' या चित्रपटात टेरेन्स लुईसला पहिला ब्रेक मिळाला होता. आतापर्यंत त्याने जवळपास 25 चित्रपट आणि म्युझिक व्हिडीओज कोरिओग्राफ केले आहेत.
टेरेन्स लुईसच्या नावाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. टेरेन्सच्या नावावर 'वर्ल्ड्स लार्जेस्ट फोटोबुक'चा विक्रम नोंद झाला आहे.
याशिवाय 2020 मध्ये टेरेन्सच्या जीवनावर 'टेरेन्स लुईस, इंडियन मॅन' हा बायोपिक पियरे एक्स गार्नियर नावाच्या फ्रेंच दिग्दर्शकाने बनवला आहे.