पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहनपूर येथे एका व्यक्तीकडे सायकल मागितली असता त्याने ती देण्यास नकार दिल्याने त्याला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. ही खळबळजनक घटना मोहनपूर भागातील दसरा खराड बरेठा येथील प्रभाग 11 मधील आहे.
भूषण पासवान असे मृताचे नाव आहे. तो गावातीलच आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू करत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसात नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, गावातील विष्णुदेव पासवान हा भूषण पासवान याच्याकडे सायकल मागण्यासाठी आले होते. भूषणने त्याला सायकल देण्यास नकार दिला. त्यावर विष्णुदेव पासवान याने त्याला शिवीगाळ केली.
मग त्याला मारहाण केली. नातेवाइकांनी सांगितले की, घटनेच्या वेळी घरातील सर्व सदस्य गावातील लग्नाला गेले होते आणि भूषण घरी एकटाच होता. विष्णुदेव पासवान याने भूषणला ओढत काही अंतरावर नेले.
त्यानंतर त्याचे इतर भाऊही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी भुषणला बेदम मारहाण केली. कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. मात्र तोपर्यंत मारहाण करणारे सर्वजण घटनास्थळावरून पळून गेले होते.
यानंतर कुटुंबीयांनी घाईघाईने भूषणला मोहिउद्दीन नगर आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सध्या सर्व आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी समस्तीपूर सदर रुग्णालयात पाठवला आहे. पटोरी डीएसपी म्हणाले की, या घटनेत सहभागी असलेल्या लोकांना पकडण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.