दिल्लीमध्ये पुन्हा एकदा श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली आहे. पोलिसांनी ढाब्यावरून एका तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटकही केली आहे. हे प्रकरण दिल्लीच्या बाबा हरिदास नगर भागात घडलं आहे. (Source: News18)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी साहिलचं 10 फेब्रुवारीला लग्न होतं, यावर निक्कीने आक्षेप घेतला होता. साहिल आणि निक्की बराच काळ रिलेशनशीपमध्ये होते. निक्की हरियाणाच्या झज्जर भागात राहते. निक्कीची हत्या केल्यानंतर आरोपी साहिल घरी पोहोचला आणि त्याने दुसऱ्या मुलीशी लग्नही केलं, अशी माहिती पोलिसांना प्राथमिक तपासात मिळाली आहे. (Source: News18)
आरोपी साहिलने पोलिसांना तपासात भरकटवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी आणखी कडक तपास केल्यानंतर त्याने धक्कादायक कबुली दिली. 9 आणि 10 फेब्रुवारीच्या रात्री आपण आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचं साहिल म्हणाला. यानंतर त्याने निक्कीचा मृतदेह मित्राओं गावाच्या बाहेर एका खाली प्लॉटमध्ये त्याच्या ढाब्याच्या फ्रीजमध्ये ठेवला.
आरोपी साहिल 2018 साली उत्तम नगरमधल्या करियर पॉईंट कोचिंग सेंटरमध्ये एसएससी परीक्षेची तयारी करत होता. हरियाणाच्या झज्जरमध्ये राहणारी निक्कीही तिकडेच मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी यायची.
आपण निक्कीसोबतच्या नात्याची माहिती घरच्यांना दिली नाही. घरच्यांनी माझं लग्न दुसऱ्या मुलीशी ठरवलं, असं साहिलने सांगितलं. साहिलने निक्कीला त्याचा साखरपुडा किंवा लग्नाबाबत काहीही माहिती दिलेली नव्हती, पण साहिल दुसऱ्या मुलीशी लग्न करणार असल्याचं निक्कीला समजलं. यानंतर दोघांमध्ये वाद झाले. साहिलने त्याच्या कारमध्ये असलेल्या मोबाईल फोनच्या डेटा केबलने निक्कीचा गळा घोटला आणि तिची हत्या केली. यानंतर साहिल त्याच्या ढाब्यावर पोहोचला आणि मृतदेहाला फ्रीजमध्ये ठेवलं. हे सगळं केल्यानंतर तो आरामात घरी पोहोचला आणि दुसऱ्या मुलीशी लग्न केलं.