तुम्ही लग्नाचे अनेक प्रकार पाहिले असतील, पण मध्य प्रदेशातील सतना येथे एक अनोखा विवाह सोहळा सर्वांच्या चर्चेचा बनला आहे. थेट लग्नमंडपात नवरदेवाला कैद करण्यासाठी पोलीस आल्याने एकच खळबळ उडाली.
मध्य प्रदेशमधील कारुआ गावात लग्नाची जोरदार चर्चा आहे. जेव्हा मुलीचे लग्न होणार होते त्या नवरदेवासह घरी पोलीस पोहोचले तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. या विवाह सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी आलेले पाहुणे पोलिसांना पाहून चकीत झाले.
सतना जिल्ह्यातील घूरडांग येथील रहिवासी असलेला विक्रम चौधरी आणि त्याच्या वडिलांवर अमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप आहे. दोघांनाही कोळगाव पोलिसांनी 14 मे रोजी अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तेथून पिता-पुत्राची तुरुंगात रवानगी करण्यात आली. आरोपी विक्रम चौधरी याचे लग्न कारुआ येथील रहिवासी रामनरेश यांच्या मुलीशी आधीच निश्चित झाले होते. हे लग्न 16 मे रोजी होणार होते.
आरोपी विक्रम चौधरी याने न्यायालयात अर्ज केला व त्याला लग्नास परवानगी देण्यात आली. कोर्टाने पूर्वनियोजित लग्नाला परवानगी दिली पण कडक पोलीस बंदोबस्तात यामुळे पोलीस घटनास्थळी पोहोचले होते.
न्यायालयाच्या आदेशानुसार, 4 पोलिसांसह 8 जणांचे पथक मिरवणुकीसह सर्व कार्यक्रमात असल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मिरवणुकीला थाटामाटात सुरुवात झाली. यानंतर लग्न झाले अन् निरोप देताना मुलगा पोलिसांच्या वाहनात तर मुलगी सासरच्यावाहनातून गेली.
वधूच्या वडिलांनी सांगितले की, लग्नाच्या एक दिवस आधी वर तुरुंगात गेल्याचे समजले. लग्न आधीच ठरलेले होते. सर्व तयारी झाली, म्हणून मुलीला आनंदाने निरोप देण्यात आला.