सिंगापूरमध्ये सुट्टीवर गेलेला कांदिवलीतील एका 14 वर्षीय मुलाच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. तो आपल्या पालकांसह सिंगापूरमध्ये सुट्टीवर गेला होता. 30 एप्रिल रोजी ते राहत असलेल्या हॉटेलच्या 10व्या मजल्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. सुट्टी घालवायला गेलेल्या कुटुंबाला अशा धक्कादायक प्रसंगाला सामोरं जावं लागलं.
मृत सोहम दीपक कदम हा कांदिवली पश्चिम येथील चारकोप येथील सिद्धी हाईट्स येथे राहणारा होता. त्याचे वडील दीपक कदम हे बांधकाम व्यावसायिक आणि आई गृहिणी आहे. 25 एप्रिल रोजी कदम कुटुंब सिंगापूरला गेले होते.
News18 लोकमत'शी बोलताना सोहमचे काका शशिकांत कदम म्हणाले, ३० एप्रिलला सोहमने रात्रीचे जेवण केलं होतं. त्याला खूप ताप आला होता, त्यामुळे त्याच्या पालकांनी त्याला झोपवलं आणि नंतर त्यांच्या खोलीत गेले.
त्याच्या खोलीत मोठी बाल्कनी होती. रात्री 11.30 च्या सुमारास सोहम उठला. तो दरवाजा उघडून बाल्कनीत गेला. तो एका कोपऱ्यात गेला जिथं रेलिंग कमी होतं.
त्याने बाल्कनीच्या कोपऱ्यात बसण्याचा प्रयत्न केला. तो झोपेत हे करत होता आणि हॉटेलच्या 10व्या मजल्यावरून पडला.
हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी आवाज ऐकला आणि त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना कळवलं. सोहमला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं, मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. कदम पुढे म्हणाले. आधी माझ्या भावाला आणि त्याच्या पत्नीला कोणीतरी धक्काबुक्की केल्याचा संशय आला. मात्र, माझ्या भावाने हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, सोहम चालत असताना गाढ झोपेत असल्याचं दिसून आलं.
सोहमचा मृतदेह मुंबईत आणण्यासाठी कुटुंबीयांची धडपड सुरू होती. चारकोप पोलिसांच्या मदतीने ते आणण्यात यश आले. चारकोप पोलीस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही सिंगापूर पोलिसांकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मागितले, पण त्यांनी ते देण्यास नकार दिला. सिंगापूर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली.