भाईंदर पश्चिमेला उत्तन परिसरात उत्तन पातान बंदर येथे समुद्र किनाऱ्यावर शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास एका बॅगेत महिलेचा शिर नसलेला मृतदेह आढळल्याची घटना समोर आली होती.
घटनेची माहिती मिळताच उत्तन सागरी पोलिसांनी घटनास्थळी पोहचत तपास सुरू केला. बॅगेत आढळलेला शिर नसलेला मृतदेह 25 ते 30 वर्षीर्य महिलेचा असून तिच्या हातावर त्रिशूल व ओम चित्र असलेला टॅटू गोंदवलेला होता.
मृतदेह असलेली बॅग पाण्यात वाहून आलेली असून नेमकी कुठून आली आहे, याचा तपास सर्व पोलीस करत होते.
नवघर पोलिसांनी मृत महिलेच्या हातावर असलेल्या टॅटू वरून तपास सुरु केला. अखेर नायगाव परिसरात एका टॅटू आर्टिस्टने त्या महिलेच्या हातावर टॅटू काढल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने महिलेचा पत्ता पोलिसांना दिला.
पोलिसांनी महिला राहत असलेल्या पत्त्यावर जात महिलेच्या नवऱ्याकडे चौकशी केली असता त्याने 24 मे ला चारित्र्यावर संशय घेत बायकोची हत्या केल्याचे कबुल केले.
हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरता स्वतःच्या भावाची मदत घेतल्याचंही त्याने सांगितलं आहे. अवघ्या 12 तासात पोलिसांना गुन्ह्याचा छडा लावला आहे.