कोल्हापुरात सतेज कृषी प्रदर्शन नुकतेच पार पडले. या प्रदर्शनात तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, विविध कृषी कंपन्या, तऱ्हेतऱ्हेचे पशु-पक्षी आदींच्या बरोबर खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील होते. या ठिकाणी खवय्यांनी भरपूर गर्दी केली होती.
प्रदर्शनात वॉटरप्रूफ कोल्हापुरी पायतान बघायला मिळाले. नागरिक मोठ्या उत्सुकतेने याविषयी चौकशी करत होते.
गव्हाची बिस्किटे, नाचणीची बिस्किटे अशा उत्पादनांचे स्टॉल देखील इथे होते. यापैकी नाचणीची बिस्किटे कशी लागतात, याची चव बऱ्याच जणांनी घेतली.
कोल्हापूर मोती उत्पादन, प्रशिक्षण आणि संवर्धन केंद्र यांच्यावतीने शेतकऱ्यांना मोत्याची शेती कशी फायदेशीर आहे याची माहिती देण्यात येत होती.
या कृषी प्रदर्शनात ठेवण्यात आलेला उंचच उंच ऊस अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. ऊंच ऊस, कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारा ऊस, काळा ऊस अशा ऊसपीकांवर शेतकऱ्यांच्या नजरा खिळत होत्या.
पशू प्रदर्शनात प्रथमच अनोखा बकरा लक्षवेधी ठरला. जवळपास 12 महिन्यांचा हा मंद्याळ जातीचा बकरा 78 किलो वजनाचा होता.
घोड्यांच्या रांगेत शाहू हा मारवाडी जातीचा घोडा उठून दिसत होता. 4 वर्षांचा बच्चा असलेला या घोड्याला साडे सहा लाख रुपये किंमत आलेली आहे. भगवान श्रीकृष्णाच्या रथाला जे 7 घोडे होते, त्यापैकीच एक असा हा शामकर्ण घोडा होता.
या प्रदर्शनात पांढरे उंदीर देखील एक वेगळे आकर्षण बनले होते. अगदी मांजराच्या लहान पिल्लांप्रमाणे दिसणारे हे उंदीर होते. लहान मुलांना यांचे खास आकर्षण राहिले.
या प्रदर्शनात प्रेक्षक आकर्षण नर खोंड गटात बाळकृष्ण सामंत यांचा नर खोंड सन्मानित करण्यात आला. दर्डेवाडी, तालुका - आजरा येथील गिर संकर जातीचा हा काळा खोंड होता
युवराज हा निगवे खालसा येथील गणेश चौगले यांचा रेडा नर-म्हैसवर्ग गटात प्रथम क्रमांक पटकावला. जवळपास १ टन वजनाचा रेडा बघायला सगळेजण हमखास येत होते. हरियाणवी गुऱ्हा जातीचा हा रेडा होता