उच्च शिक्षण घेतलेले तरुण काही खास प्रयोग करण्यासाठी शेती सुरू करतात. त्यांच्यातील अभ्यासाचा, संशोधक वृत्तीचा, अद्ययावत ज्ञानाचा शेतीला फायदा होतो.
नाशिक जिल्ह्यातील आयटीचं शिक्षण घेतलेल्या तरुणानंही बांबू शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.
प्रशांत दाते असं या प्रयोगशील तरुणाचं नाव असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही त्याच्या प्रयोगाची दखल घेतली आहे.
प्रशांतला एका वनअधिकाऱ्यानं बांबूच्या शेतीबद्दल माहिती दिली. त्यानंतर त्यानं आपला फोकस निश्चित केला.
जगभरात जवळपास 148 प्रजातींचे बांबू असल्याची माहिती आहे,त्यातील 96 प्रजातींचे संकलन प्रशांतने केले आहे. एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात कुठेही संकलन नसल्याचं त्यानं सांगितलं.
बकाल बांबू, बिधुली बांबू, स्पेनडर बांबू, वेल बांबू,लतन्यान बांबू,सिल्क बांबू,गोहरा बांबू, का काळा बांबू, कटांग बांबू अशा 96 प्रजातींचं त्यानं संकलन केलं आहे.
त्यानं केलेल्या या संकलनाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड या दिग्गज संस्थांनीही घेतली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारीप्रमाणेच संभाजीराजे छत्रपती यांनीही प्रशांतच्या या प्रयोगाची पाहणी केली आणि त्याचं कौतुक केलं.
बांबूच्या शेतीमध्ये स्कोप मोठा असल्यानं प्रशांत आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये याबाबत जागृतीचं काम करत आहे.