नवी दिल्ली, 18 जुलै : शिंदे गटाने शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वत: एकनाथ शिंदेंनीच शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त केली आहे. यावेळी शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. ज्यांच्यावर सुप्रीम कोर्टात कारवाईची टांगती तलवार आहे, ते असा निर्णय कोणत्या अधिकाराने घेऊ शकतात? असा प्रश्न विचारत शिंदे यांची ही अखेरची धडपड असलेली टीका राऊत यांनी केली. काय म्हणाले संजय राऊत? माध्यमांतून ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहे, त्या संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली आहे. माध्यमात येणारं हे वृत्त म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस सीझन टू आहे. कॉमेडी एक्सप्रेस सीझन पहिला मुंबईत झाला. आता जिथं बेकायदेशीरपणे दोन जणांचे मंत्रीमंडळ स्थापन केलं आहे. सुप्रीम कोर्टात ज्यांच्यावर अपात्रतेच्या कारवाई संदर्भात प्रकरण प्रलंबित आहे. ते स्वतःची कातडी वाचण्यासाठी, आमदार सांभाळण्यासाठी हा प्रकार सुरू आहे. शिवसेनेची कार्यकारणी ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली आहे. शिवसेना हा काही गट नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारे आमची कार्यकारणी बरखास्त करण्याचा अधिकार त्यांना नाही. आमदार सांभाळण्यासाठी शिंदे गटाची धडपड. शिवसेना नोंदणीकृत पक्ष आहे. शिवसेनेचे नेतेमंडळ आणि कार्यकारीणी ही बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केली आहे. शिंदे गटाकडून ही अखेरची धडपड आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. शिवसेनेला खात्री आहे, की आम्हाला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल. अजूनपर्यंत आम्ही संयम बाळगला आहे. पण, ज्या दिवशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा सुरू करतील तेव्हा तुफान आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील राऊत यांनी शेवटी दिला.
ठाकरेंना सर्वात मोठा झटका? शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्हं धनुष्यबाण शिंदे गटाला मिळणार?
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाकडून शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाने शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वत: एकनाथ शिंदेंनीच शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त केली आहे. यावेळी शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवडही करण्यात आली आहे. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली असून नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. याशिवाय उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. अद्याप तरी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखपदाला हात लावलेला नाही. मात्र आमदारांचा विषय न्यायप्रविष्ठ असतानाही एकनाथ शिंदेंनी नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केल्यामुळे ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे.