नागपूर, 26 एप्रिल : कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिविरचा तुटवडा असतानाच काही लोक त्याचा काळाबाजार करत आहेत. गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातही असा प्रकार घडला. याठिकाणी परिचारिकेने इंजेक्शन चोरून काळ्याबाजारात विकले. नागपूर पोलिसांनी या प्रकरणी गडचिरोली सामान्य रुग्णालयाच्या परिचारिकेला अटक केली आहे. त्यात आता भाजप आमदार डॉ. देवराव होळी प्रकणाचा खरा सूत्रधार शोधण्याची मागणी केली आहे. (वाचा- कोरोना लशीबाबत मोठा निर्णय होणार? लस उत्पादक कंपन्यांकडे केंद्राने केली एक मागणी ) नागपूरमध्ये सद्या रेमडेसिविरचा मोठा काळाबाजार होत आहे. त्यामुळं टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी नागपूरचे बेलतरोडी पोलीस चौकशी करत होते. या प्रकरणी अटक केलेल्यांच्या चौकशी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातून रेमडीसीवर इंजेक्शन चोरून काळ्याबाजारात विक्री होत असल्याचं समोर आलं. अधिक चौकशीत गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारीका पल्लवी मेश्रामचं नाव पुढं आलं. त्यानंतर नागपूर पोलिसांच्या पथकानं पल्लवीला अटक करून नागपूरला नेलं आहे. (वाचा- BMC म्हणतेय, 1 मेपासून 18+ मुंबईकरांना कोरोना लस नका देऊ कारण… ) पल्लवीनं जवळपास 6 ते 12 इंजेक्शन चोरल्याची चर्चा आहे. पण नेमकं काही समोर आलेलं नाही. त्यामुळं पोलिसांच्या चौकशीकडं सर्वांच्या नजरा आहेत. पल्लवी मेश्राम अटक केलेला मुख्य आरोपी अतुल वाळकेची मेहुणी आहे. गेल्या आठ वर्षांपासून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारिका म्हणून ती कार्यरत आहे. दरम्यान, गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासन यासंदर्भात काहीही बोलत नाही. तर हा प्रकार गंभीर असून आतापर्यंत किती इंजेक्शन चोरी गेले आणि त्यामागे खरा सूत्रधार कोण आहे हे शोधून काढण्याची गरज आहे. त्यामुळं प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व दोषींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केली आहे. उपलब्ध इंजेक्शनचा साठा, दैनंदिन नोंद याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.