पुणे, 06 एप्रिल: मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुर्यानं तापायला सुरुवात केल्यानंतर अजूनही विदर्भकरांना उसंत दिली नाही. गेल्या काही दिवसांपासून वाढत गेलेलं तापमान विदर्भात (Temperature in Vidharbha) उद्याही कायम राहणार आहे. उद्या मराठवाड्यासह विदर्भातील विविध ठिकाणी उष्णेतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. काल विदर्भातील ब्रम्हपूरी या ठिकाणी तापमानाने उच्चांक नोंदवला आहे. येथील तापमान 43.5 अंश सेल्सियसवर पोहचलं होतं. त्यामुळे पूर्ण एप्रिल महिन्यात विदर्भातील कमाल तापमान चाळीशीच्या आसपास असणार आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांना उन्हापासून तुर्तास दिलासा मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. गेले दोन दिवस पुण्याला तापमानाने काही प्रमाणात दिलासा दिल्यानंतर आता उद्या पुण्यातील चाळीशी पार करण्याची शक्यता आहे. काल पुणे आणि मुंबईच्या शहराच्या मधल्या पट्ट्यात ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर आज पुन्हा तापमान वाढून चाळीशीच्या उंबरठ्यावर पोहचलं आहे. तर उद्या हे तापमान चाळीशी पार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना भरपूर पाणी पिण्याचे तसेच सुती आणि ढगाळे कपडे परिधान करण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील चंद्रपूर, नागपूर, अकोले, नांदेड या जिल्ह्यांना उष्णतेच्या जास्त झळा बसणार आहेत. मराठवाड्यातही काही प्रमाणात हीच असणार आहे. या तुलनेत मुंबईतील हवामान झुकतं असलं तरी मुंबईतील हवामान वाढणाऱ्या आर्द्रतेमुळं मुंबईकरांही उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. (हे वाचा- पुण्यात कोरोनाची स्थिती हाताबाहेर? मनपा हद्दीत एकही व्हेंटिलेटर बेड मिळेना ) महाराष्ट्रातील करोना स्थिती आणि उन्हाची दाहकता या दोन्ही संकटांच्या कात्रीत महाराष्ट्रातले नागरिक सापडत आहेत. खरंतर भर उन्हात कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावल्याने श्वास घ्यायला त्रास होतं आहे. तसेच शरीरातील दाहकता कमी करण्यासाठी रस्त्यावरील ज्युस अथवा थंड पदार्थ खाण्याचीही भीती वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना दुहेरी संकटाला सामोरं जावं लागतं आहे. त्यामुळे सकाळी 11 ते 4 या वेळेत घराबाहेर पडायचा टाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.