इटली, 13 फेब्रुवारी : कोरोना व्हायरसचं (Corona Virus) संकट अजूनही कमी होताना दिसून येत नाही. कोरोनाचे विविध प्रकार समोर येत असून अनेक दुष्परिणाम देखील समोर येत आहेत. यामध्ये एका महिलेची बोटं कोरोनाच्या दुष्परिणामांमुळं काळी पडल्याचं समोर आलं आहे. इटलीमधील 86 वर्षीय महिलेची ही काळी पडलेली बोटं कापावी लागली आहेत. युरोपियन जर्नल ऑफ व्हॅस्क्युलर आणि एन्डोव्हॅस्कुलर सर्जरी (Journal of Vascular and Endovascular Surgery) या वैद्यकीय जर्नलमध्ये याचे फोटो प्रकाशित करण्यात आले आहेत. इटलीमधील डॉक्टरांनी याला कोरोना व्हायरसचं गंभीर प्रकरण म्हटलं आहे. अशाच प्रकारची प्रकरणं बर्याच कोरोना व्हायरस रूग्णांमध्ये आढळून आली आहेत. यामध्ये रक्तात गुठळ्या तयार होण्याबरोबरच रक्त वाहिन्यांमध्ये अडथळे देखील निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. या वृद्ध इटालियन महिलेच्या उजव्या हाताचं दुसरं, चौथं आणि पाचवं बोट काळं पडलं होतं. पण महत्त्वाचं म्हणजे या महिलेला कोरोनाचं कोणतंही लक्षण जाणवलं नव्हतं. डॉक्टरांच्या माहितीनुसार या महिलेच्या बोटांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यानं तिचा रक्तप्रवाह खंडित झाला होता.
मिररमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार, मार्चमध्ये तिला अक्यूट कोरोनरी सिंड्रोम (Acute Coronary syndrome) आढळून आला होता. यामध्ये त्यांच्या हृदयाला होणारा रक्तप्रवाह कमी झाला होता. यानंतर रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याने बोटांना होणारा रक्तप्रवाह देखील खंडित झाला होता. चांगल्या पेशी खराब झाल्यानंतर रक्तवाहिन्या खराब झाल्यास रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते. यामुळं रोगप्रतिकारक यंत्रणेत ‘सायकोटाईन स्टॉर्म तयार होते. यामुळं रक्तदाब कमी होऊन रक्तामध्ये गुठळ्या तयार होतात. मार्चमध्ये या महिलेच्या हृदयाला रक्त पुरवठा कमी होऊ लागल्यानंतर डॉक्टरांनी औषधं दिली होती. परंतु त्यानंतर महिला कोरोना संक्रमित आढळून आली होती. पण कोरोनाची लक्षणं दिसत नव्हती. महिन्याभरानंतर या महिलेच्या शरीरामध्ये ड्राय गँगरीन आढळून आल्यानंतर तिच्या उजव्या हाताची बोटं काळी पडू लागली.
डॉक्टरांनी निरीक्षण केल्यानंतर तिच्या धमन्यांमध्ये कमी रक्तदाब असल्याचं आढळून आलं. यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करत तिची तीन बोटं कापली. यानंतर मायक्रोस्कोपमध्ये पेशींचं परीक्षण केल्यानंतर इंट्राव्हॅस्क्यूलर थ्रोम्बोसिसची (Intravascular Thrombosis) चिन्ह आढळून आली होती. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्चचे प्रोफेसर ग्रॅहान कुके यांच्या मते, कोरोना खूपच वेगळा आजार आहे. इतर विषाणूजन्य आजारांपेक्षा वेगळी असणारी त्याची वैशिष्ट्ये ही एक जास्त हायपरकोग्लेबल अवस्था आहे, ज्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या आवश्यकतेपेक्षा जास्त असतात. अनेक कोरोना रुग्णांच्या शरीरांत डॉक्टरांना रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याचं आढळलं आहे. दरम्यान, डेली मेलच्या वृत्तानुसार लंडनच्या किंग्ज कॉलेजमधील प्रोफेसर रूपेन आर्य यांच्या अंदाजानुसार मे महिन्यातील कोरोना व्हायरसच्या एकूण रुग्णांपैकी 30% रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याचं आढळून आलं होतं. याचबरोबर कोरोना संक्रमणामध्ये थ्रोम्बोसिस (Thrombosis) ही एक मोठी समस्या असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं.