मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाचा विजय व्हावा यासाठी एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी विशेष पूजा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली
मुंबई, 15 नोव्हेंबर : 3 महिन्यांपूर्वी सुरत व्हाया गुवाहाटी मुक्कामुळे राज्यातील सत्तानाट्य घडले. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदारांना घेऊन गुवाहाटी गाठणार आहे. येत्या 21 नोव्हेंबर रोजी गुवाहाटीला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकारी गुवाहाटी येथील कामाख्या देवीच्या दर्शनाला २१ नोव्हेंबरला जाणार आहे. हा एक दिवसाचा हा दौरा असेल. दौऱ्यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून, सर्व आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. सत्तांतराच्या काळात मुख्यमंत्र्यांनी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाऊन मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा दर्शनाला येईन असे सांगितले होते, त्यामुळेच मुख्यमंत्री सर्व आमदारांना घेऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहे. (जितेंद्र आव्हाडांच्या जामीन अर्जावर कोर्टात हायहोल्टेज ड्रामा, दुपारी 2 वाजता होणार फैसला) विशेष म्हणजे, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाचा विजय व्हावा यासाठी एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी विशेष पूजा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कामाख्या देवीवर मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी श्रद्धा आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे आपल्या आमदारांसह गुवाहाटीला मुक्कामी होते. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदे यांनी सर्व आमदारांना घेऊन कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. यावेळी देवीची पूजा करून शिंदे आमदारांना घेऊन गोव्यात आले आणि तिथून मुंबईत पोहोचले होते. आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला आमदारांना घेऊन जात आहे. कामाख्या देवीचं मंदिर आणि माहात्म्याबद्दल हिंदूंच्या 51 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कामाख्या देवीचं मंदिर हे भारतातलं एकमेव असं मंदिर आहे जिथं महिला त्यांच्या पाळीच्या काळातही (Women Periods) देवीचं दर्शन घेऊ शकतात. एरव्ही महिलांना पाळीच्या काळात देवळात जाण्यास किंवा शुभ कार्यात सहभागी होण्यास मज्जाव केला जातो. इथं दिला जाणारा प्रसादही विशेष असतो. (Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या विनयभंग प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदेंची पहिलीच प्रतिक्रिया म्हणाले) कामाख्या मंदिराचा इतिहास कामाख्या मंदिर भारतातल्या सर्वांत जुन्या मंदिरांपैकी एक आहे. आठव्या आणि नवव्या शतकात या मंदिराची उभारणी झाली असं मानलं जातं. इतिहासानुसार 16 व्या शतकात मुघल आक्रमकांनी हे मंदिर उद्धवस्त केलं होतं. पण बिहारचे राजे राजा नर नारायण सिंह यांनी 17 व्या शतकात मंदिर पुन्हा उभारलं. इथलं रहस्य शक्तिपीठांपैकी महापीठ म्हणून या मंदिराची ख्याती आहे. या मंदिरात दुर्गा किंवा अंबामातेची मूर्ती नाही. इथं एक कुंड आहे आणि ते कायम फुलांनी झाकलेलं असतं. या कुंडातून नेहमी पाणी प्रवाहित होत असतं. या मंदिरात देवीच्या योनीची पूजा केली जाते. इथं मातेची योनी असल्याने तिला ही पाळी येते असं मानतात त्यामुळे तिचं हे रजस्वला रूप आहे. मातेच्या पाळीच्या तीन दिवसांच्या काळात मातेच्या दरबारात पांढरं कापड आंथरलं जातं. जेव्हा तीन दिवसांनी पाळी संपल्यावर दरबार उघडला जातो तेव्हा ते कापड लाल झालेलं असतं. हे लाल कापडच भक्तांना प्रसाद म्हणून दिलं जातं. या कापडाला अंबुवाची कापड असं म्हणतात आणि ते माता सतीच्या पाळीतील रजामुळे लाल झालेलं असतं. हे कापड, हा प्रसाद हिंदूधर्मियांसाठी पवित्र आहे. मनोकामना पूर्ण करते कामाख्या देवी काली आणि त्रिपुरसुंदरी नंतर कामाख्या देवी ही तांत्रिकांसाठी म्हणजे काळी जादू करणाऱ्यांसाठी महत्त्वाचं दैवत आहे. कामाख्येची पूजा भगवान शंकरांच्या नववधूच्या रूपात केली जाते. कामाख्या देवी मुक्ती देते आणि सर्व इच्छाही पूर्ण करते अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. मंदिर परिसरात भक्ताने कोणतीही इच्छा व्यक्त केली की ती पूर्ण होते असं सगळे मानतात. त्यामुळेच या मातेला इच्छा पूर्ण करणारी म्हणून कामाख्या म्हटलं जातं. मंदिराच्या शेजारीच एका मंदिरात मातेची मूर्तीही प्रतिष्ठित केली आहे. काळ्या जादूसारख्या इतरही अघोरी विद्या या मंदिरात आल्यावर सिद्ध होतात असा समज या विद्या जाणणाऱ्यांचा आहे त्यामुळे साधू आणि अघोरी विद्या जाणणारे लोक तुम्हाला इथं दिसतील. त्यांच्याशी संबंधित वस्तूही या मंदिर परिसरात दृष्टिस पडतील.