नवी दिल्ली, 09 डिसेंबर: येणारं 2021 हे नवीन वर्ष आनंद घेऊन येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सर्वांत मोठी खूशखबर आहे ती रोजगार क्षेत्रातील. जानेवारी ते मार्च 2021 या काळात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळणार असून, कंपन्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती करणार असल्याचं मॅनपॉवर ग्रुपच्या एंप्लॉयमेंट आउटलुक सर्व्हेमध्ये (Manpower Group Employment Outlook Survey) समोर आलं आहे. कोरोना साथीमुळं (Corona Pandemic) या वर्षात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार कमी झाले, पण आता परिस्थिती बदलत आहे. राष्ट्रीय पातळीवर रोजगारांच्या आकडेवारीत सुधारणा होत असल्याचं दिसत आहे. जसजशी अर्थव्यवस्था रुळावर येत आहे, तसतशा रोजगाराच्या संधी वाढत आहेत. याच विषयावरील मॅनपॉवर ग्रुपच्या एंप्लॉयमेंट आउटलुक सर्व्हे नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यात नोंदवण्यात आलेल्या निष्कर्षानुसार, डिसेंबर 2020 अखेर संपत असलेल्या तिमाहीच्या तुलनेत 2021 च्या जानेवारी-मार्च या पहिल्या तिमाहीत अधिक नोकऱ्या मिळणार आहेत. या सर्व्हेमध्ये देशातील 1 हजार 518 कंपन्यांचा समावेश आहे. या पहिल्या तिमाहीत रोजगार क्षेत्रात पाच टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात वाढणार रोजगाराच्या संधी डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत 2021 च्या पहिल्या तिमाहीत रोजगार क्षेत्रात 2 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. फायनान्स, इन्श्यूरन्स, रिअल इस्टेट, मायनिंग आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रात सर्वाधिक नियुक्त्या होण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर क्षेत्रात मात्र घसरण दिसू शकते. 6-9 महिन्यात वाढणार रोजगाराच्या संधी मॅनपॉवर इंडिया ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संदीप गुलाटी म्हणाले, देशातील कार्पोरेट क्षेत्रात चांगली तेजी दिसत आहे. शेअर बाजारातही सकारात्मक वातावरण दिसत आहे. भौगोलिक स्थिरता, अर्थव्यवस्थेतील वैविध्य अशा अनेक कारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था स्थिर राहिली आहे.’ (हे वाचा- Gold Price Today: सोन्याचांदीची झळाळी उतरली, दागिने खरेदीआधी तपासा बुधवारचे दर ) सरकारने उचललेली पावले, खासगी क्षेत्राला गती देण्यासाठी आखलेली धोरणे, आत्मनिर्भर भारत अभियान, स्पर्धात्मकता याचाही अर्थ व्यवस्थेवर चांगला परिणाम होण्याची अपेक्षा आहे. सणासुदीचा काळ असल्यानं अर्थव्यवस्था सुधारत आहे. कंपन्याही सकारात्मक दृष्टीकोन दर्शवत आहेत. त्यामुळे पुढील सहा ते नऊ महिन्यात नियुक्त्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, असं गुलाटी यांनी सांगितलं. मॅनपॉवर ग्रुपच्या अहवालानुसार, जवळपास 65 टक्के कंपन्यांनी सांगितले आहे की, येत्या नऊ महिन्यात त्यांच्याकडील कर्मचारी संख्या कोविड 19 ची साथ येण्याआधी जितकी होती, तेवढी पुन्हा होऊ शकेल. डिसेंबर अखेर संपलेल्या तिमाहीत नव्या नोकऱ्यांचे प्रमाण 44 टक्के होते.