20 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्यामुळे दुखावलेले कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी यांनी आता बंडखोरीचे संकेत दिले. आज (गुरूवारी) सुरेश कलमाडी दिल्लीवरून पुण्यात परतले.
यावेळी त्यांच्या समर्थकांनी विमानतळावर त्यांचं जोरदार स्वागत केलं. यावेळी कलमाडींची छोटेखानी रॅलीही काढण्यात आली. समर्थकांनी केलेलं स्वागत हे कलमाडींचं शक्तीप्रदर्शन मानलं जातंय. तसंच आपण कार्यकर्त्यांचा भेटी घेण्यासाठी पुण्यात आलो असून उद्या शुक्रवारी 4 वाजता कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार असून त्यानंतर आपला निर्णय जाहीर करणार असल्याचं कलमाडींनी स्पष्ट केलं.
लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून सुरेश कलमाडींना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरू होती पण काँग्रेसने कलंकित नेत्यांना बाजूला सारत नव्या उमेदवारांना तिकीट दिलंय. दोनच दिवसांपुर्वी काँग्रेसने आपली यादी जाहीर केली. सुरेश कलमाडी यांना काँग्रेसनं उमेदवारी नाकारून त्यांच्याऐवजी विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली.