17 मार्च : अखेर शिवबंधनाचा धागा तोडून शिवसेनेचे नेते राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती नार्वेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. या प्रवेशासह नार्वेकरांना थेट दिल्लीचे तिकीट मिळाले आहे.
राष्ट्रवादीने मावळमधून नार्वेकरांना उमेदवारी दिलीय. शिवसेनेत घुसमट झाली, पक्षांतर्गत राजकारणाला बळी पडल्यामुळे सेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असं स्पष्टीकरण राहुल नार्वेकर यांनी दिलं. तसंच जे काम पक्षनेतृत्वाकडून व्हायला पाहिजे होते ते मला करावं लागलं.
पण त्याचंही दुख नाही, एखादा कार्यकर्ता पक्षासाठी काम करतो, मतांसाठी धावपळ करतो एवढं सगळं करत असताना आपल्याच पक्षातील लोक पाडण्यासाठी प्रयत्न करतात त्यामुळे हतबल होऊन माघार घ्यावी लागली असंही नार्वेकर म्हणाले. नार्वेकर यांनी राष्ट्रवादी प्रवेश केल्यामुळे सेनेला चांगलाच धक्का बसलाय.
नार्वेकरांनी पक्षावर विश्वास ठेवायला हवा होता, आणखी वाट पाहायला हवी होती. जर उद्धव ठाकरेंना कल्पना देऊन उमेदवारी मागे घेतल्याचं नार्वेकर म्हणतात, पण मग शिवसेना का सोडली ? असा सवाल सेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्हे यांना विचारला. तसंच नार्वेकर यांच्या पक्ष सोडण्यानं आम्हाला फरक पडणार नाही. मावळमध्ये बारणेंच्या मागे पूर्ण ताकदीनं शिवसेना उभी राहिल असंही गोर्हे म्हणाल्या. तर चांगल्या माणसाला उमेदवारी देणं हे प्रत्येक पक्षाचं कर्तव्य आहे. कालपर्यंत जो माणूस शिवसेनेच्या गळ्यातला ताईत होता तो अचानक पक्ष सोडून का गेला, याचा विचार शिवसेनेनं करावा असा टोला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद आव्हाड यांनी लगावला. मावळमध्ये सेना-राष्ट्रवादी आमनेसामने मावळमधून राष्ट्रवादीने राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यामुळे मावळची निवडणूक रंगतदार होणार आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याविरोधात राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादीने उभं केलंय. विशेष म्हणजे बारणे यांना उमेदवारी दिल्यामुळे खासदार गजानन बाबर यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला. त्यामुळे सेनेची मावळमध्ये आणखी पंचाईत झाली. मावळमध्ये आम आदमी पक्षाकडून मारुती भापकर यांना उमेदवारी दिलीय. तर लक्ष्मण जगताप हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे मावळमध्ये खरी लढत ही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना पाहण्यास मिळणार आहे. मावळची लढाई