29 नोव्हेंबर : लैंगिक अत्याचार प्रकरणी तहलकाचा माजी संपादक तरुण तेजपालला गोवा सेशन्स कोर्टाने तात्पुरता दिलासा दिलाय. तेजपालच्या जामीन अर्जावर कोर्टाने स्थगिती दिलीय. त्यामुळे उद्या दुपारपर्यंत अटक करता येणार नाही असंही कोर्टाने स्पष्ट केलं.
शुक्रवारी संध्याकाळी तेजपाल चौकशीसाठी गोव्याला निघाला होता. गोव्यात विमानतळावर पोहचल्यानंतर पोलिसांनी विमानातच तेजपालला ताब्यात घेतलं. त्याला तेथून गोवा पोलीस चौकशीसाठी घेऊन जाणार होते. मात्र त्याअगोदरच कोर्टाने जामीन अर्जावर स्थगिती दिल्यामुळे तुर्तास तेजपालाची अटक टळलीय. तेजपाल विमानतळावर पोहचल्यानंतर विमानतळाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले.
तेजपालवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच पीडित तरुणीचा जबाब नोंदवल्यामुळे पोलिसांनी आज अटकेची कारवाई केली. आज शुक्रवारी दुपारी तेजपाल दिल्लीतून गोव्याला चौकशासाठी निघाले होते. त्यावेळी दिल्ली एअरपोर्टवर त्याच्यासोबत गोवा पोलिसही होते. मी स्वतःहून गोव्याला जातोय, गोवा पोलिसांच्या संपर्कात आहे असं तेजपालनं सांगितलं होतं. या प्रकरणाचा तपास करणार्या अधिकार्यांना मला माझी बाजू सांगायची आहे आणि कालही मी या तपास करणार्या अधिकार्यांच्या संपर्कात होतो, असं त्यानं म्हटलंय. त्याच्या जामीन अर्जावर उद्या दुपारी 2.30 वाजता गोवा सेशन्स कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यानंतरच त्याला अटक होते की दिलासा मिळतो हे पाहण्याचं ठरेल.