17 जानेवारी : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज शुक्रवारी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात ‘दंबग’ भूमिका घेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आपल्या भाषणात अनेक धोरणांची त्यांनी घोषणा केली. स्वयंपाकाच्या गॅसच्या अनुदानित सिलेंडरची संख्या 12 पर्यंत वाढवण्याची मागणी त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे जाहीर सभेत केली. राहुल गांधी यांनी मागणी करताच केंद्र सरकार कामाला लागलं आहे. पुढच्या आठवड्यात त्यासंबंधी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी दिली.
आता नऊ सिलेंडरमुळे काही जमत नाहीय, आता आम्हाला 12 सिलेंडर हवे आहेत, काँग्रेस सरकार आणि देशातील महिलांना 12 सिलेंडर हवे आहेत अशी मागणी राहुल यांनी आज शुक्रवारी झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात केली. मागील वर्षी अनुदानित सिलेंडरवर मर्यादा घालण्यात आली होती. सुरुवातीला 6 सिलेंडरची घोषणा करण्यात आली होती. मात्र या निर्णयामुळे सर्वत्र विरोध होत होता त्यामुळे 6 सिलेंडरची संख्या 9 करण्यात आली होती.
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली त्यामुळे काँग्रेसने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी गॅस सिलेंडरची संख्या 12 वर करणार असल्याचे संकेत दिले होते. आता याबद्दल खुद्द राहुल गांधी यांनी मागणी केल्यामुळे केंद्र सरकार कामालं लागलंय. याबाबत पुढील आठवड्यात 12 अनुदानित सिलेंडरची घोषणा करणार असल्याचं पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी जाहीर केलंय. विशेष म्हणजे लोकपाल विधेयकाबाबतही राहुल गांधी यांनी सकारत्मक भूमिका घेतली होती त्यानंतर राज्यसभा आणि लोकसभेत तातडीने लोकपाल विधेयकावर कायद्याची मोहर उमटवण्यात आली होती.