नवी दिल्ली, 16 मार्च : ‘द काश्मिर फाईल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. सिनेमा रिलीज झाल्यानंतर या सिनेमाची आणि काश्मिरी पंडितांबाबत (Kashmiri pandit) सध्या जोरदार चर्चा होत आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला आहे. लोकसभेत काश्मिरी पंडितांचा मुद्दा आणि महागाई या दोन्ही मुद्दयांवरुन सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोदी सरकारला रोखठोक सवाल केला आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप संसदीय समितीच्या बैठकीत ‘द काश्मिर फाईल्स’ सिनेमावर भाष्य केलं तसेच तो पाहण्याचे आवाहन केले. हा सिनेमा जम्मूतील काश्मिरी पंडितांना भोगाव्या लागलेल्या यातना आणि हल्ल्याच्या भीतीने करावं लागलेलं विस्थापन यावर आधारित आहे. या सिनेमाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, असे सिनेमा आखणी बनले पाहिजेत. सत्य सर्व स्वरूपात बाहेर आले पाहिजे. जे सत्य अनेक दशकांपासून दडपले गेले होते ते सत्य सिनेमातून समोर आले आहे.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला सवाल केले आहेत. सुप्रिया सुळे म्हणाल्या, एखादं मुल कुपोषित असेल तर त्याच्यासाठी आई काय करते? त्याला खायला-प्यायला देईल, त्याला निरोगी ठेवेल. त्याचप्रमाणे काश्मिरी पंडितांसाठी खूप काही करता आलं असतं. वाचा : ‘The Kashmir Files’ चित्रपटाबद्दल PM मोदींचं मोठं विधान, म्हणाले… अर्थसंकल्पात जम्मू-काश्मीरसाठी केंद्र सरकारने काय तरतूद केली? विस्थापित काश्मिरी पंडितांची स्थिती सुधारण्यासाठी कोणते नवे कार्यक्रम तयार केले? गेल्या 60 वर्षांत जे घडले ते घडले, त्याची आणखी किती पुनरावृत्ती होईल. सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुम्हाला काश्मिरी पंडितांच्या स्थितीबाबत इतकीच काळजी वाटत असेल तर त्यांच्याशी संबंधित योजनांचा अर्थसंकल्पात समावेश करा. त्यांच्या भल्यासाठी वेगळी योजना आणा. गेल्या 60 वर्षांत त्यांच्यावर किती अत्याचार झाले हे वेगळे सांगायची गरज नाही. तुम्हाला सत्तेय येऊन सात वर्षे झाली. तुम्ही त्यांना मदत का करत नाही?