नवी दिल्ली 06 डिसेंबर : शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी (Wasim Rizvi) इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला आहे. दसना देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद गिरी महाराज यांनी त्यांचा सनातन धर्मात प्रवेश करण्याचा आणि हिंदू धर्म संस्कार कार्यक्रम केला. गाझियाबादमधील डासना देवी मंदिरात त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे (Wasim Rizvi Accept Hindu Dharma). संपूर्ण विधी आणि रितीरिवाजासह त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. या विधींचे फोटो आणि व्हिडिओ (Wasim Rizvi Video) समोर आले आहेत.
हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर वसीम रिझवी म्हणाले, ‘इथे धर्मांतराची काही बाब नाही, जेव्हा मला इस्लाममधून बहिष्कृत करण्यात आले, तेव्हा मी कोणता धर्म स्वीकारावा हा माझा निर्णय आहे. सनातन धर्म हा जगातील पहिला धर्म आहे आणि यात भरपूर चांगुलपणा तसंच माणुसकी आहे. हे सर्व इतर कोणत्याही धर्मात नसून मी तर इस्लामला धर्म समजतच नाही. दर शुक्रवारी आमच्यावरील बक्षीस वाढवलं जातं, म्हणून आज मी सनातन धर्म स्वीकारत आहे.’
वसीम रिझवी यांनी कुराणातील 26 श्लोकांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यामुळे कट्टरपंथी मुस्लीम अनेकदा वसीम रिझवी यांना लक्ष्य करतात.काही दिवसांपूर्वीच वसीम रिझवी यांचं मृत्यूपत्र चर्चेचा विषय ठरलं होतं. त्यात त्यांनी मृत्यूनंतर मला दफन करू नये, तर हिंदू रितीरिवाजांनुसार माझ्यावर अंत्यसंस्कार करावेत, अशी घोषणा केली होती. यती नरसिंहानंद यांनी माझ्या चितेला अग्नी द्यावी असेही ते म्हणाले होते. यानंतर आता प्रत्यक्षात त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश करत हा धर्म स्वीकारला आहे.