मुंबई, 2 जून : भारत जगात सर्वाधिक दूध (Milk) उत्पादन करणारा देश असून आपल्या देशातील सर्वांना शुद्ध दूध मिळत नाही. घरी वापरण्यात येणाऱ्या दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये भेसळयुक्त दूध विकणाऱ्या दूधवाल्यांना 9 लाख 33 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एप्रिल 2021 ते मार्च 2022 या आर्थिक वर्षात दुधाची 207 सॅम्पल घेण्यात आली. त्यापैकी 144 सॅम्पलचे रिपोर्ट आले आहेत. त्यापैकी 56 सॅम्पल फेल झाली आहेत. 16 सॅम्पलमध्ये डिटर्जंटचे अंश आढळून आले आहेत. तर 40 सॅम्पलमधून दुधाची साय गायब होती. अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त अर्चना धीरन यांनी ही माहिती दिली आहे. दूध ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डब्यांची स्वच्छता न केल्याने डिटर्जंट आढळून आल्याचे अन्न विभागाच्या सहायक आयुक्त धीरन यांनी सांगितलं. दुधाची सॅम्पल वेळोवेळी घेतली जात आहेत आणि ही कारवाई सुरूच राहणार आहे. घरी राहूनही कुटुंबातील सदस्य स्वतः दुधाची चाचणी करू शकतात, असंही त्यांनी सांगितलं. घरी दुधाची चाचणी कशी करावी? एखाद्या चमकणाऱ्या पृष्ठभागावर दूधाचा एक थेंब टाकला तर तो थेंब घरंगळत पुढे जातो आणि मागे त्याच्या पांढऱ्या खुणा दिसतात. परंतु, जर दुधात पाणी मिसळलेलं असेल तर ते दूध लवकर घरंगळत पुढे जातं आणि पांढऱ्या खुणा दिसत नाहीत. तसंच टिंक्चर आयोडिनचे (Tincture Iodine) काही थेंब टाकल्यावर स्टार्च असलेल्या दुधाला निळा रंग येतो. टिंक्चर आयोडिन औषधाच्या दुकानात सहज मिळतं. दुधात युरियाच्या भेसळीची तपासणी करण्यासाठी परीक्षानळीमध्ये थोडं दूध घेऊन त्यात अर्धा चमचा सोयाबीन किंवा तूर पावडर टाकून पाच मिनिटं ठेवा. यानंतर लाल लिटमस पेपर (Red litmus paper) दुधात बुडवल्यानंतर लाल कागदाचा रंग निळा झाल्यास दुधात युरियाची भेसळ असल्याचं स्पष्ट होतं. स्टेशनरीच्या दुकानात रेड लिटमस पेपर मिळतो. High Cholesterol: कोलेस्ट्रॉल जास्त वाढतं तेव्हा पायावर अशी लक्षणं दिसतात; लगेच डॉक्टरांकडे जा दुधात तेलाची भेसळ तपासण्यासाठी एका परीक्षानळीमध्ये तीन ते पाच मिलिलिटर दूध घेऊन त्यात हायड्रोक्लोरिक अॅसिडचे 10 थेंब आणि एक चमचा साखर (Sugar) टाका. पाच मिनिटांनी त्यात लाल रंग दिसू लागल्यास दुधात भेसळ केली आहे, असं समजून घ्या. दरम्यान, आरोग्य विभागाची मोहीम इट राईट कॅम्पस स्कूलमध्येही सुरू करण्यात आली असून, मंदिरातील प्रसादाबाबतही आरोग्य विभागाची मोहीम सुरू आहे, अशी माहिती धीरेन यांनी दिली आहे.