प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी लखनऊ, 13 जानेवारी : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचं (UP Election 2022) बिगूल वाजल्यापासून प्रचंड राजकीय घडामोडींना (UP Politics) वेग आला आहे. विधानसभा निवणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून भाजपला (BJP) सतत एकामागे एक धक्के बसताना दिसत आहेत. पक्षातील ओबीसी (OBC) आमदार आणि मंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ते एकामागे एक राजीनामा देताना दिसत आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठींची चिंता वाढली आहे. पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांना थांबवणं हे पक्षश्रेष्ठींपुढील मोठं आव्हान आहे. पक्षश्रेष्ठी त्याबाबत काय विचार करतात हे येत्या काळात समजलेच. पण तितका विचार करण्याआधीच भाजपाला आता 14 वा सर्वात मोठा फटका बसला आहे. कारण भाजपचे आयुष, अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्री डॉ. धर्म सिंह सैनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धर्म सिंह यांनी आपल्या राजीनाम्याचं पत्र राज्यपालांनाही पाठवलं आहे. धर्म सिंह सैनी यांच्याआधी 13 आमदरांनी राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामध्ये दोन मंत्र्यांचा समावेश होता. त्यानंतर धर्म सिंह हे 14 वे आमदार आणि मंत्रिमंडळातील तिसरे मंत्री आहेत. धर्म सिंह सैनी राजीनाम्यात नेमकं काय म्हणाले? “मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात आयुष, अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागात राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) या पदावर कार्यरत राहून सर्वोतोपरी त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. दलित, मागासलेले, शेतकरी, शिक्षित बेरोजगार, लघू आणि मध्यम श्रेणीतील व्यापाऱ्यांनी मिळून प्रचंड बहुमत देऊन भाजपचं सरकार स्थापन केलं होतं. पण त्यांची आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींना जे वारंवार उपेक्षित वागणूक दिली गेली त्या कारणाने मी उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देतोय”, असं डॉ. धर्म सिंह सैनी राज्यपालांना दिलेल्या पत्रात म्हणाले आहेत. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील एक सूचक ट्विट केलं आहे.
भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या आमदारांची यादी 1.स्वामी प्रसाद मौर्य 2.भगवती सागर 3.रोशनलाल वर्मा 4.विनय शाक्य- 5.अवतार सिंह भाड़ाना 6.दारा सिंह चौहान 7.बृजेश प्रजापति 8.मुकेश वर्मा 9.राकेश राठौर 10.जय चौबे 11.माधुरी वर्मा 12.आर के शर्मा 13. बाला प्रसाद अवस्थी ( शरद पवारांचा भाजपला धक्का, ‘या’ नेत्याच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ ) राजीनामा देण्यामागचं नेमकं कारण काय? ओबीसी समजाचे मोठे नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि दारसिंग चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी राजीनामा दिल्याने देशभराचं उत्तर प्रदेशाच्या राजकारणाकडे लक्ष गेलं आहे. भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या सर्व मंत्री आणि आमदारांचं योगी सरकारकडून दलित, मागास, ओबीसी समाजावर अन्याय करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या ओबीसी नेत्यांचं मन पुन्हा भाजपमध्ये वळवण्यास पक्षश्रेष्ठींना प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागणार आहे. दुसरीकडे पक्षातीलच दिग्गज नेते सोडचिठ्ठी देत असल्याने भाजपच्या मित्र पक्षांकडूनही आता दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. युपीत भाजपचा मित्र पक्ष असलेला अपना दलाने निवडणुकीसाठी 36 जागा मागितल्या आहेत. त्यामुळे आता पुढच्या घडामोडी नेमक्या काय घडतात ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.