UP Election: भाजपचा जाहीरनामा; कॉलेज विद्यार्थिनींना मोफत स्कूटी अन् 3 कोटी रोजगार देणार
लखनऊ, 8 फेब्रुवारी : उत्तरप्रदेशातील सत्ताधारी भाजपने (BJP) आगामी यूपी विधानसभा निवडणूक 2022 (UP Election 2022) साठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याला भाजपने लोक कल्याण संकल्प पत्र असं संबोधलं आहे. या संकल्प पत्राच्या पहिल्या पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांचे फोटो आहे. या संकल्प पत्रात भाजपने तरुण, विद्यार्थी, महिला आणि शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. (BJP release manifesto Lok Kalyan Sankalp Patra for UP Election 2022) 3 कोटी तरुणांना रोजगार, विद्यार्थिनींना मोफत स्कूटी आपल्या संकल्प पत्रात भाजपने पुढील 5 वर्षांत 3 कोटी तरुणांना रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच महाविद्यालयात जाणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींना मोफत स्कूटी देण्याचे आश्वासनही दिले आहे. यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने विविध पावले उचलणार असल्याचंही म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाने प्रसिद्ध केलेल्या लोक कल्याण संकल्प पत्रात उज्वला योजने अंतर्गत होळी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर 2 सिलिंडर मोफत देण्याचं आश्वासनही दिलं आहे.
पुढील पाच वर्षांत सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय 5000 कोटी रुपये खर्चाची मुख्यमंत्री कृषी सिंचन योजना सुरू करण्याचे सांगण्यात आले आहे. या योजने अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना बोअरवेल, कूपनलिका, तलाव, टाक्या इत्यादी बांधकामासाठी अनुदान दिले जाणार आहे. वाचा : Aurangabad: शेतकऱ्याच्या जनधन खात्यावर जमा झाले 15 लाख अन् बांधलं स्वप्नातलं घर आणि मग… यासोबतच 25,000 कोटी रुपयांची सरदार वल्लभभाई पटेल कृषी-पायाभूत सुविधा अभियान योजना सुरू कऱण्याचंही म्हटलं आहे. या अंतर्गत राज्यभरात ग्रेडिंग यूनिट, कोल्ड चेन चेंबर्स, प्रोसेसिंग यूनिट तयार करण्यात येणार आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पेमेंट आणि एमएसपीवर विशेष भर अमित शहा आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह वरिष्ठ भाजप नेत्यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत म्हणजेच एमएसपी संदर्भात विशेष घोषणा करणअयात आली आहे. पुढील 5 वर्षांत एमएसपीवर गहू आणि धान्याच्या खरेदीत आणखी सुधारणा करण्यात येईल असं जाहीरनाम्यात म्हटलं आहे. यासोबतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 14 दिवसांत पेमेंट करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. या मुदतीत पेमेंट न केल्यास कारखान्यांकडून व्याजसह रक्कम वसूल करण्यात येईल असंही जाहीरनाम्यात म्हटलं आहे. इतकेच नाही तर सरकार सत्तेवर आल्यास 5000 कोटी रुपये खर्चून ऊस गिरणी नूतनीकरण अभियान राबवण्यात येईल असंही आश्वासन भाजपने दिलं आहे.