लखनऊ, 23 फेब्रुवारी: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 (UP Assembly Election 2022) साठी चौथ्या टप्प्यातील मतदान आज म्हणजेच 23 फेब्रुवारी (4th Phase Voting) होत आहे. चौथ्या टप्प्यात (UP 4th phase election) 9 जिल्ह्यांतील 59 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये रोहिलखंड ते तराई बेल्ट आणि अवध प्रदेशापर्यंत 624 उमेदवार रिंगणात आहेत. त्याचवेळी, पहिल्या तीन टप्प्यात यूपी विधानसभेच्या 403 जागांपैकी 172 जागांसाठी मतदान झाले आहे. तर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 59 विधानसभा जागा रायबरेली, पिलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, लखनौ, उन्नाव, फतेहपूर आणि बांदा जिल्ह्यातील आहेत. चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतदानाच्या तयारीबाबत एडीजी एलओ प्रशांत कुमार यांनी सांगितले की, मतदानापूर्वी सर्व विधानसभा जागांवर शांततेत मतदानासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे. संवेदनशील बूथवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. एडीजी एलओ प्रशांत कुमार म्हणाले की, चौथ्या टप्प्यातील 59 विधानसभांपैकी 3 संवेदनशील आहेत. संवेदनशील विधानसभांमध्ये हुसैनगंज, बिंदकी, फतेहपूर यांचा समावेश आहे. ते म्हणाले की, यापैकी 590 मजरे आणि परिसर असुरक्षित आहेत तर 3393 मतदान ठिकाणे गंभीर मानली गेली आहेत. महिलांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. चौथ्या टप्प्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये 137 पिंक बूथ (महिला बूथ) तयार करण्यात आले आहेत. पिंक बूथवर 36 महिला निरीक्षक, उपनिरीक्षक आणि 277 महिला कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले आहेत. ईव्हीएमच्या सुरक्षेत 860 कंपनी निमलष्करी (पॅरामिलिट्री), 21 कंपनी PAC तैनात चौथ्या टप्प्यातील मतदान आणि त्यानंतर होणाऱ्या मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस पूर्णपणे सज्ज झाले आहेत. मतदान केंद्र, स्ट्राँग रूम आणि ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी 860 कंपनी निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. यूपी पोलिसांचे 7022 निरीक्षक, उपनिरीक्षक, 58132 कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल चौथ्या टप्प्यात तैनात करण्यात आले आहेत. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी 21 कंपनी पीएसी, 50 हजार 490 होमगार्ड, 1850 पीआरडी जवान, 8486 चौकीदार यांनाही निवडणूक ड्युटी लावण्यात आली आहे. पोलिसांनाही कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रायबरेलीवरही खास नजर यूपी निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात लखनऊसह रायबरेलीवरही विशेष लक्ष असेल, कारण हा गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या येथून लोकसभेच्या खासदार आहेत. यासोबतच चौथ्या टप्प्यात काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या निवडणूक रणनीतीचीही चाचपणी केली जाणार आहे. अवध विभागातील जागांवर सर्वांचं लक्ष लागलं आहे, कारण गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षानं येथे विजय मिळवला, त्याच पक्षानं सरकार स्थापन केलं आहे. त्याच वेळी चौथ्या टप्प्यात, अनुसूचित जाती (SC) च्या उमेदवारांसाठी 16 जागा राखीव आहेत.