JOIN US
मराठी बातम्या / देश / 'मोदी सरकार'मधल्या दोन मंत्र्यांचे राजीनामे, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही 'शिंदें'चं वजन वाढलं!

'मोदी सरकार'मधल्या दोन मंत्र्यांचे राजीनामे, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही 'शिंदें'चं वजन वाढलं!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत, या दोघांचे राजीनामे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारले आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 6 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत, या दोघांचे राजीनामे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारले आहेत. मुख्तार अब्बास नकवी (Mukhtar Abbas Naqvi) आणि राम चंद्र प्रसाद सिंग या दोघांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपला आहे, त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्तार अब्बास नकवी यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्याकडे असलेला अल्पसंख्याक कल्याण विभाग स्मृती इराणींकडे (Smriti Irani) तर राम चंद्र प्रसाद सिंग यांच्याकडे असलेलं स्टील मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांच्याकडे देण्यात आला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे आधीपासून नागरी हवाई उड्डयन मंत्रालय आहे, त्यानंतर आता त्यांना ही अतिरिक्त जबाबदारीही सोपावण्यात आली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार? ज्योतिरादित्य शिंदे आणि स्मृती इराणी यांच्याकडे सध्या अतिरिक्त मंत्रालय देण्यात आली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महाराष्ट्रामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर या चर्चा आणखी जोरात होऊ लागल्या आहेत. महाराष्ट्रातून पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात जबाबदारी देण्यात आली आहे. तसंच आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदारही बंड करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. शिवसेनेच्या खासदारांनीही बंड करून वेगळा गट स्थापन केला, तर त्यांना केंद्रात मंत्रीपदं मिळणार का? अशा चर्चाही सुरू आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशन आणि राष्ट्रपती निवडणुकीआधी शिवसेनेतही जोरदार हालचाली सुरू आहेत. शिवसेनेने खासदार भावना गवळी यांची लोकसभेतील मुख्य प्रतोद पदावरून हकालपट्टी केली आहे, त्यांच्याऐवजी राजन विचारे यांची प्रतोदपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याचं पत्र संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्ष आणि संसदीय कामकाज मंत्र्यांना दिलं आहे. याशिवाय शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र लिहून भाजप तसंच एनडीए पुरस्कृत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या