हैदराबाद, 23 मार्च : तेलंगणामध्ये (Telangana) मोठी दुर्घटना घडली आहे. हैदराबादमध्ये (fire broke out in a scrap shop in Bhoiguda Hyderabad) एका लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेत 1 जण बचावला आहे. एनआयएन वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील भोईगुडा परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात असलेल्या एका लाकडाच्या गोदामाला आज पहाटे भीषण आग लागली.
लाकडाचा मोठा साठा असल्यामुळे काही क्षणात आगीचा मोठा भडका उडाला. बघता बघता संपूर्ण गोदाम आगीच्या भक्षस्थानी सापडले. यावेळी गोदामात असलेले १२ कर्मचारी आगीत सापडले होते. त्यापैकी ११ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एक जण सुखरुप बचावला आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचे काम अजूनही युद्धपातळीवर सुरू आहे. शॉटसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. एकाच वेळी आगीत ११ जणांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अग्निशमन आणि रुग्णावाहिका घटनास्थळी दाखल आहे.