नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर गेल्या महिन्याभरापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पुढे ढकलली गेली आहे. पण, आज शिवसेनेनं याबद्दल सरन्यायाधीशांकडे विनंती केली. त्यामुळे आज दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास सुनावणी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सत्ता संघर्षावर गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पुढे ढकलली गेली होती. त्यामुळे शिवसेना सर्वोच्च न्यायालयात आज याचिका मेन्शन केली. सातत्याने सुनावणी पुढं ढकलत असल्याने आज शिवसेना सर्वोच्च न्यायालयात प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला केली. आत्तापर्यंत ८ ऑगस्ट, १२ ऑगस्ट, २२ ऑगस्टला आणि २३ ची सुनावणी पुढं ढकलली आहे. पण आता न्यायालयाने शिवसेनेची मागणी मान्य केली आहे. आज दुपारीच सुनावणी होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने आज १०.३८ मिनिटांनी आजच्या याचिकांची यादी जारी केली. यामध्ये महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची यादी देखील समाविष्ट करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर यादी येणे नवीन आश्चर्यच आहे. आज या प्रकरणात न्यायाधीश रमन्ना नवीन खंडपीठ स्थापन करण्याची शक्यता आहे. सोबतच विधी तज्ञाच्या मतानुसार, या प्रकरणात घटनापिठाची देखील स्थापना केली जाऊ शकते. मात्र, आज सरन्यायाधीश रमन्ना यांच्या तीन सदस्यीय खंडपीठातील न्यायमूर्ती कृष्णमुरारी व्हीसी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहतील. काल ते आजारी असल्याने सुनावणी पुढं ढकलण्यात आली होती. आज सरन्यायाधीशांच्या न्यायालयातील यादीतील याचिकांचे सुनावणी झाल्यानंतरच साधारण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. शिवसेना कुणाची? शिवसेना कुणाची? याबाबत शिंदे गट आणि शिवसेनेने दाखल केलेल्या विविध याचिकांवर सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. यापूर्वीच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याबाबत सुतोवाच केले होते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला आव्हान दिले आहे. बंडखोर आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेची परवानगी देण्याचा राज्यपालांचा निर्णय यावर शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिंदे सरकारने विधिमंडळात सादर केलेला बहुमताचा प्रस्ताव व त्याच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला शिवसेनेने आव्हान दिले आहे. घटनापीठामुळे सुनावणीस विलंब काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत नियोजित वेळापत्रकानुसार 22 ऑगस्ट रोजीच या प्रकरणावर सुनावणी होईल, असे स्पष्ट केले होते. राज्यातील सत्तासंघर्षाबाबतची सुनावणी आणखी मोठ्या घटनापीठाकडे द्यायची की नाही, हे ठरवायचे आहे. त्यामुळे सुनावणीस विलंब होत असल्याचेही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर अखेरीस आज सुनावणी होणार आहे.