इंदूर, 23 एप्रिल : लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना बुधवारी इंदूरच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून गुरुवारी त्यांचा कोविड रिपोर्ट निगेटिव्हही आला आहे. दरम्यान त्यांच्या मृत्यूची खोटी बातमी (Sumitra Mahajans Death Fake News) व्हायरल झाली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सोशल मीडियावर ट्वीट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. अनेक माध्यमांनीदेखील याबाबतचं वृत्त प्रसारित केलं. या संपूर्ण प्रकरणावर आता सुमित्रा महाजन यांची प्रतिक्रिया (Sumitra Mahajan on Fake Death News ) आली आहे. सुमित्रा महाजन म्हणाल्या, की खात्री केल्याशिवाय माध्यमांनी अशा प्रकारचं वृत्त प्रसारित करणं अत्यंत चुकीचं आहे. माध्यमांनी निदान प्रशासनाकडून या वृत्ताबाबत खात्री करुन घ्यायला हवी होती. पुढे त्या म्हणाल्या, की माध्यमांमध्ये ही बातमी पाहिल्यानंतर मुंबईतून मला माझ्या अनेक नातेवाईकांचे फोन आले. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सोशल मीडियावर ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली होती, याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, की शशी थरुर यांचं ट्विट माझ्या भाचीनं रिट्विट केलं आणि तिनं त्यांना सवालही विचारला, की मी सुमित्रा महाजन यांची भाची आहे, तुम्हाला ही चुकीची बातमी कोणी दिली? सुमित्रा महाजन यांच्या निधनाची खोटी बातमी; सुप्रिया सुळेंनीही केली चूक या वृत्तामागे काहीतरी गडबड असल्याचंही महाजन यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी असा सवालही उपस्थित केला, की मुंबईतील चॅनेलनंच अशा प्रकारचं वृत्त का दिलं, यामागे काहीतरी गडबड असण्याची शंका त्यांनी उपस्थित केली. सध्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात मध्यप्रदेशातील इंदूर शहरातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याचदरम्यान सुमित्रा महाजन यांच्या निधनाची खोटी बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.