अयोध्या, 7 एप्रिल : युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या दौऱ्याआधी अयोध्येत (Ayodhya) शिवसेनेकडून (Shiv Sena) पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरबाजीतून शिवसेनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘असली येत आहे, नकली पासून सावधान’, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने पोस्टरच्या माध्यमातून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाण्याआधी आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून अयोध्या शहरात पोस्टर लावण्यात आले आहेत. राज ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या सभेत अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. राज ठाकरे 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत. मनसेकडून त्यासाठी जोरदार तयारी देखील केली जात आहे. अयोध्याला जाण्यासाठी मनसेकडून 10 ते 12 रेल्वेगाड्या बुक केल्या जाणार असल्याचीदेखील माहिती समोर आली होती. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे हे देखील अयोध्याला जाणार असल्याची माहिती दिली होती. आदित्य ठाकरे हे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अयोध्येला जाण्याची शक्यता आहे. पण त्यांच्या दौऱ्याआधी अयोध्येत शिवसेनेकडून मनसेला खोचक टोला लगावणारी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. ( ‘पक्षशिस्तीचे पालन करा, अन्यथा…’, मनसेच्या ज्येष्ठ नेत्याची कार्यकर्त्यांना तंबी ) ‘आम्हाला डिवचणाचा प्रयत्न करू नका’, मनसेचा इशारा शिवसेनेच्या टीकेवर मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “कोण असली, कोण नकली हे संपूर्ण महाराष्ट्र आणि देश जाणून आहे. तुम्ही हिरवा हातात घेतलाय, सत्तेसाठी हिंदूत्व लाथाडलेलं आहे. तुमचं हिंदूत्व नकली आहे. राज ठाकरे यांचे हिंदूत्व सोन्यासारंख अस्सल आहे. तुम्ही नका ठरवू, आम्हाला डिवचणाचा प्रयत्न करू नका”, असा इशारा यशवंत किल्लेदार यांनी दिला आहे. दरम्यान, मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. या संदेशातून त्यांनी कार्यकर्त्यांना पक्षशिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केलं आहे. तसेच त्याचे पालन न केल्यास गंभीर दखल घेतली जाईल, अशी तंबी मनसैकांना दिली आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची अधिकृत भूमिका प्रसारमाध्यमांमध्ये मांडण्याचे काम पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व प्रवक्ते करीत असतात. पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि प्रवक्त्यांव्यतिरिक्त इतर कोणीही प्रसारमाध्यमांसमोर राजकीय भूमिकांबाबत भाष्य करु नये”, असं आवाहन नितीन सरदेसाई यांनी केलं आहे. “पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांवर वा अन्यत्र कुठेही राजकीय टीका-टिप्पणी करताना भाषेचे भान बाळगावे. पक्षशिस्तीचे पालन प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला करावेच लागेल, अन्यथा गंभीर दखल घेतली जाईल”, अशी तंबी मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.