श्रीनगर, 30 मार्च : जगातील सर्वात मोठं दान हे पैशाचं किंवा श्रमाचं नसतं तर, जीवनदान हे सर्वांत मोठं दान मानलं जातं. एखाद्याचे प्राण वाचवणं हीच सर्वांत मोठी ईश्वरसेवा असते. योग्य वेळी रक्त न मिळाल्यानं जगात दररोज अनेकांना जीव गमवावा लागतो. हे टाळण्यासाठी आपल्या परीनं हातभआर लावणारे काश्मीरचे शब्बीर हुसेन खान हे एक अशी व्यक्ती आहेत, ज्यांनी आतापर्यंत तब्बल 174 वेळा रक्तदान (blood donation) केलंय. शब्बीर यांचं नाव केवळ काश्मीरमध्येच नाही तर, संपूर्ण भारतामध्ये रक्तदात्यांच्या श्रेणीत आहे. 57 वर्षीय शब्बीरने श्रीनगरमधील त्यांच्या घराजवळील रुग्णालयामध्ये आतापर्यंत 174 वेळा रक्तदान केलंय. श्रीनगरचे रहिवासी असलेले शब्बीर त्यांची आजारी आई, भाऊ आणि दत्तक घेतलेल्या मुलीसोबत राहतात. त्यांनी लग्न केलेलं नाही आणि लोकांच्या जीवनातील दु:ख दूर करणे हा त्यांच्या जीवनाचा उद्देश आहे, असा त्यांचा विश्वास आहे. मीडियासोबत आपला अनुभव शेअर करताना शब्बीर यांनी सांगितलं की, 4 जुलै 1980 रोजी दुपारी ते त्याच्या घरी झोपले होते. तेवढ्यात त्यांना बाहेरून आवाज आला. जेव्हा ते बाहेर आले, तेव्हा त्यांनी पाहिलं की, त्यांचा मित्र फुटबॉल खेळताना गंभीर जखमी झाला आहे. त्याचं बरेच रक्त वाहून गेलं होतं. त्याला रक्त द्यावं म्हणून ते दवाखान्यात धावले. तेव्हापासून आजतागायत ही प्रक्रिया थांबलेली नाही. शब्बीर यांचा रक्तगट ओ-निगेटिव्ह (‘O’ negative) असून तो दुर्मीळ श्रेणीत येतो. पहिल्यांदा रक्तदान करताना ते घाबरले होता. पण आता ही बाब त्यांच्यासाठी सामान्य झाली आहे. दहशतवादग्रस्त काश्मीरमधील रुग्णालयांमध्ये अनेकदा रक्ताची गरज भासते. खान दरवर्षी 4-5 वेळा रक्तदान करतात. रक्तदानात त्यांचं योगदान केवळ काश्मीरमध्येच नाही तर, संपूर्ण भारतात आहे. रेडक्रॉसशी 40 वर्षांपासून संलग्न खान लोकांमध्ये रक्तदानाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी मोहिमा चालवत आहेत. गेल्या 40 वर्षांपासून ते रेडक्रॉसशी निगडीत आहेत आणि 40 लोकांच्या टीमचे नेतृत्व करतात. संपूर्ण काश्मीरमध्ये जिथे जिथे रक्ताची गरज असते, तिथं ते पोहोचतात. काश्मीरमध्ये 1990 मध्ये दहशतवाद शिगेला पोहोचला होता. यादरम्यान लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात शेकडो लोक जखमी झाले आणि अनेकांना प्राण गमवावे लागले. त्या काळात खान यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. खान यांचं जीवन सोपं नव्हतं. ते रोजंदारीवर काम करायचे आणि कागदाच्या लगद्यापासून वस्तू बनवून विकायचा. त्यांच्या आजारी आईची काळजी घेण्यासाठी त्यांना दुसरं काम शोधावं लागलं. त्यांचं चांगलं काम पाहून नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मदर तेरेसा यांनी त्यांना कोलकाता इथं बोलावलं. तिथं त्यांनी दोन आठवडे तिथल्या झोपडपट्टीत काढले. इंडियन रेडक्रॉस सोसायटी काश्मीरचे किफायत रिझवी म्हणतात की, खान यांचा उत्साह आणि योगदान यांची तुलना होऊ शकत नाही. राज्य पुरस्कारासाठी त्यांचं नाव पाठवण्याचं काम करू शकतो आणि ते आम्ही करत आहोत. सरकार त्यांचा सन्मान करेल, असं सांगण्यात येत असलं तरी 2003 पासून फक्त ही चर्चा आहे. अद्याप पुरस्कार मिळालेला नाही. आपण ईश्वराच्या मर्जीनं काम केलं आहे, असं शब्बीर म्हणतात, त्यामुळं जो सन्मान करायचा, तो ईश्वरच करेल, असं ते म्हणाले.