राहुल गांधी
श्रीनगर, 30 जानेवारी : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेले पाच महिने सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ पदयात्रेचा समारोप आज दुपारी श्रीनगरमध्ये होणार आहे. गेले पाच महिने 4 हजार किलोमीटर पदयात्रा करून जनतेशी संवाद साधणारे राहुल गांधी काश्मीरमध्ये या यात्रेचा आज समारोप करणार आहेत. काँग्रेसने या मोठ्या कार्यक्रमासाठी 21 समविचारी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण दिलं आहे. मात्र या यात्रेच्या समारोप कार्यक्रमाचं निमंत्रण असूनही तृणमूल काँग्रेसचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा आहे. यात्रा समाप्तीच्या पूर्वसंध्येला श्रीनगरमधील लाल चौकात राहुल गांधींनी तिरंगा ध्वज फडकवला आणि उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ काँग्रेसने देशभरातून काढलेल्या भारत जोडो पदयात्रेला सामान्य जनेतेने अद्वितीय प्रतिसाद आणि प्रेम दिलं आहे. त्याचा परिणाम भारतीय राजकारणावर नक्की होणार आहे, पण तो कशा पद्धतीने होईल हे मी आत्ताच सांगणार नाही. ’ काँग्रेसची रॅली आज श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर स्टेडियममधून राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली एक रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत काँग्रेसच्या नेत्यांसह इतर समविचारी नेतेही सहभागी होणार आहेत. त्यानंतर काँग्रेसच्या जम्मू आणि काश्मीर येथील मुख्यालयात यात्रेच्या समारोपाचा कार्यक्रम होईल. या पक्षांची उपस्थिती कन्याकुमारीतून 7 सप्टेंबर 2022 ला सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात द्रविड मुन्नेत्र कळघम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल, उद्धव ठाकरेंची शिवसेना, माकप, सीपीआय, विदुथालई चिरुथांगल काटची, केरळ काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा या 12 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या पक्षांच्या अध्यक्षांना वैयक्तिक पत्र लिहून आमंत्रित केलं आहे. हेही वाचा : Vande Bharat Express : ‘तो’ फोटो Viral होताच रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा, आता प्रवाशांनाच… 4 हजार 80 किलोमीटरचा पायी प्रवास दरम्यान, 29 जानेवारी हा या पदयात्रेतील शेवटचा दिवस होता. रविवारी श्रीनगरमधील पंथा पार्कपासून यात्रा सुरू झाली आणि बोलव्हर्ड रोडवरील नेहरू पार्कमध्ये पदयात्रा संपली. राहुल गांधींनी त्यानंतर तिरंगा फडकवला. या वेळी प्रियांका गांधीही उपस्थित होत्या. या पदयात्रेने 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतून 4 हजार 80 किलोमीटरचा पायी प्रवास केला. राहुल गांधींनी या यात्रेदरम्यान 12 जाहीर सभा, 100 कोपरा सभा, 13 पत्रकार परिषदा घेतल्या. त्याचबरोबर पदयात्रेत चालता-चालता त्यांनी 275 महत्त्वाच्या व्यक्तींशी संवाद साधला आणि 100 ठिकाणी भेटी देऊन तिथं बसून जनतेशी संवाद साधला.