प्रशांत लिला रामदास, नवी दिल्ली 9 जानेवारी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बुधवारी राजधानी दिल्लीत भेट झाली. राहुल गांधी पवारांच्या 6 जनपथ या निवासस्थानी गेले. त्याच्यासोबत महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मर्लिकार्जुन खरगे सोबत होते. या बैठकीत महाराष्ट्रातल्या जागावाटपावर चर्चा झाली. महाराष्ट्रातलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीतलं जागावाटप जवळपास निश्चित झालं असून फक्त आठ जागांचा पेच बाकी आहे. त्यावर या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोनही नेत्यांची झालेली ही पहिलीच बैठक आहे. या भेटीत राजकीय विषयांवरही चर्चा झाली. शरद पवार तिसरी आघाडी तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यावरही या बैठकीत चर्चा झाली. तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानी जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देशम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांची मंगळवारी रात्री बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्याच्या दिशेनं पाऊल टाकण्याच्या दृष्टीने चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. संध्याकाळी फारुख अब्दुला आणि चंद्राबाबू नायडू शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी प्रफुल्ल पटेल सुद्धा हजर होते. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या रॅलीमध्ये सहभागी होण्यबाबत चर्चा झाल्याचं या नेत्यांनी ठरवलं आहे. या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘आजच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांच्या रॅलीमध्ये सर्व विरोधी पक्षांनी सहभागी व्हावे’, असा निर्णय झाला अशी माहिती शरद पवार यांनी दिली. तसंच , ‘भाजप विरोधी राजकीय पक्षांना त्यात समाविष्ट करण्याकडे आमचा भर राहणार आहे’, असंही पवार यांनी सांगितलं आहे. असं होणार काँग्रेस राष्ट्रवादीचं जागावाटप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचा तिढा 4 जानेवारीला झालेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर सुटला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी 50-50 च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकसभेच्या प्रत्येकी 24 जागा लढवणार हे आता नक्की झालं आहे. तसंच त्यातील दोन्ही पक्ष आता आपल्या वाट्यातून मित्रपक्षांना काही जागा देणार आहेत. राज्यात भाजपविरोधात महाआघाडी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. बऱ्याच बैठकानंतर दोन्ही पक्षांचं आता जागावाटपावर एकमत झालं आहे. राष्ट्रवादीची तयारी सुरू काँग्रेससोबत आघाडीची बोलणी पूर्ण झाल्यानंतर आता राष्ट्रवादीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. आपल्या वाट्याच्या 24 जागांचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीनेही जोरदार तयारी सुरू केलीय. आघाडीत आपल्याला मिळालेल्या कोणत्या जागा मित्रपक्षांना सोडाव्यात, तसंच कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार प्रभावी ठरेल, यावर राष्ट्रवादीचं विचार मंथन सुरू आहे.