इस्लामाबाद 31 मार्च : भारत आणि पाकिस्तानमधील (India Pakistan) संबंध पुन्हा एकदा सुरळीत होत असल्याचं चित्र आहे. यासाठी पाकिस्तान स्वतः पुढे येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी म्हणजेच आज पाकिस्तान सरकार भारतासोबतचे व्यापारी संबंध पुन्हा एकदा सुरू करण्यावर विचार करणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक बाबतीत पाकिस्तानची कॅबिनेट समिती भारताकडून साखर आणि कापूस आयात (Import of Sugar And Cotton) करण्याच्या निर्णय घेण्यची शक्यता आहे. पाकिस्तानी वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता समितीची बैठक होणार आहे. ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-कश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर आणि दोन नव्या केंद्र शासित प्रदेशात राज्याच्या रुपांतरानंतर पाकिस्ताननं भारतासोबतचे संबंध तोडले होते. दुसरीकडे, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहून म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यासह दोन्ही देशांमधील प्रलंबित असलेल्या सर्व मुद्द्यांसह, अर्थपूर्ण आणि निर्णय घेण्यासाठी महत्त्वाच्या चर्चेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. पाकिस्तान दिनाच्या निमित्ताने गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना पाठवलेल्या शुभेच्छांच्या उत्तरात खान यांनी हे पत्र लिहिले आहे. पंतप्रधानांच्या पत्रावर उत्तर देत इम्रान खान यांनी आभार मानले आहेत. पाकिस्तानचे लोक भारतासहित सर्व आसपासच्या देशांसोबत शांतीपूर्ण संबंध बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दहशतवादाच्या मुद्यावर खान म्हणाले, की शांती तेव्हाच शक्य आहे, जेव्हा जम्मू काश्मीरसारखे प्रलंबित मुद्दे सोडवले जातील. खान यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी भारताला शुभेच्छाही दिल्या आहेत. दोन्ही देशांमध्ये अनुकूल वातावरण तयार करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.