"तुमच्यात ताकद असेल तर...." नवनीत राणांचं पुन्हा उद्धव ठाकरेंना आव्हान
नवी दिल्ली, 14 मे : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार केला. त्यानंतर मुंबईत जोरदार राडा झाला. या प्रकरणात राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटकही केली. त्यानंतर आज राणा दाम्पत्याने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं, आजच्या शिवसेनेच्या सभेचा टिझर पाहिला. त्यात उद्धव ठाकरे म्हणतात तुम्ही मला वज्रमूठ द्या, दात पाडण्याचं काम मी करतो. जर इतकी ताकद आहे तर औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यांचे दात आधी तोडून दाखवा तर तुम्हाला मानेल. असं म्हणत नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. दिल्लीतील कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना नवनीत राणा यांनी हे विधान केलं आहे.
नवनीत राणा यांनी पुढे म्हटलं, उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्रावर संकट आलेलं आहे. हे संकट दूर करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे. ज्या-ज्या ठिकाणी हनुमान चालीसा मला बोलता येईल त्या ठिकाणी मी बोलणार. मला बंद करण्यासाठी 14 दिवस कमी पडतील. दिल्लीतील हे एक प्राचीन मंदिर आहे आणि त्यामुळे आम्ही येथे महाआरती करत आहोत. आजच्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत मुख्यमंत्री विरोधकांच्या सर्व टीकांना प्रत्युत्तर देणार आहेत. या सभेसाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेकडून या सभेचा आता तिसरा टिझर लाँच करण्यात आला आहे. या टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील काही विधान आहेत. या विधानांमधून ते विरोधकांवर आक्रमकपणे निशाणा साधताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा मुंबईतल्या बिकेसी मैदानात संध्याकाळी 7 वाजता पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंची होणारी सभा अभूतपूर्व करण्यासाठी शिवसेनेची जय्यत तयारी झाली आहे. शिवसेनेच्या या जाहीर सभेत उद्धव ठाकरे अनेकांच्या तोंडावरचे मास्क उतरवणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनीच काही दिवसांपूर्वी जाहीर केलंय. त्यामुळे या आक्रमक सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.