लखनऊ, 15 एप्रिल : कोरोनानं (Corona) उत्तर प्रदेशातही (uttar pradesh) त्याचा कहर दाखवायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक प्रचंड वाढ झाली आहे. राजधानी लखनऊमध्येही (lakhnau) कोरोनानं हाहाकार माजवला आहे. याठिकाणी कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे बुधवारी एकाच स्मशानात अनेक मृतदेहांवर अंत्यंसंस्कार होत असल्याचं दिसत होतं. मात्र आता प्रशासनानं या स्मशानाच्या आतील काहीही दिसू नये म्हणून प्रशासनानं थेट स्मशानाच्या चारही बाजुंनी पत्रे लावून टाकले आहेत. (वाचा - Shocking : कोरोनानं घेतला पतीचा बळी, पत्नीची तीन वर्षीय मुलासह आत्महत्या ) लखनऊमधली वैकुंठ धाम ही सर्वात मोठ्या स्मशानभूमीपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांत उत्तर प्रदेशात कोरोनाचा कहर वाढला आहे. लखनऊमध्येही कोरोना रुग्ण आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळं स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी मृतदेहांची रांग लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. बुधवारी तर वैकुंठ धाम स्मशान भूमित मृतदेहांची रांग लागली होती.
एकाचवेळी अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासनावर विरोधकांनी जोरदार टीका केली. परिणामी गुरुवारी चारही बाजुला पत्र्याचे कंपाऊंड करत आतले काही दिसणार नाही अशा पद्धतीनं प्रशासनानं स्मशानभूमी झाकून टाकली. आता यावरूनही विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
राजकारण्यांनी या मुद्द्यावरून सत्तेत असलेल्या भाजपवर हल्लाबोल सुरू केला आहे. आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी यावरून टीका करत, जर एवढे परिश्रम हॉस्पिटल तयार करण्यासाठी घेतले असते तर स्मशानभूमी लपवावी लागली नसती असं म्हटलं आहे. तर काँग्रेसनही यावरून जोरदार टीका केली आहे. (वाचा - ‘ज्यांचं वय होतं,त्यांना मरावंही लागतंच’, या राज्यातील मंत्र्याचं खळबळजनक विधान ) लखनऊमध्ये सध्या कोरोनाचा संसर्ग वेगानं पसरत आहे. शहरामध्ये रोज कोरोनाची लागण होणाऱ्यांचा आकडा 5 हजारांच्या पुढे केला आहे. तसंच मृत्यूचे प्रमाणही वाढलं आहे. टेस्ट, रिपोर्ट येण्यास लागणार वेळ अशाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहेत. बुधवारी वैकुंठ धाममध्ये अंत्यसंस्कार झालेले सर्व मृत्यू कोरोनामुळे झाले नसल्याचं सरकार सांगत आहे. पण आता स्मशानभूमी झाकून टाकल्यामुळे सरकावर आणखी टीकेची झोड उठताना दिसत आहे.