कर्नाटक, 26 जुलै: अखेर कर्नाटकचे मुख्यमंत्री (Karnataka CM) बी एस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा (Resign) दिला आहे. त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. कर्नाटक राज्य सरकारला 26 जुलै म्हणजेच आज दोन वर्षे पूर्ण झालीत. दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर येडीयुरप्पा यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. राजीनामा देणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली.
राजीनामा देण्यासाठी कोणीही माझ्यावर दबाव आणला नाही. मी स्वत: हून राजीनामा दिला आहे जेणेकरुन सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणीतरी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारू शकेल. पुढील निवडणुकीत मी भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी काम करेन, अशी प्रतिक्रिया बी.एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर दिली आहे.
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांचे मी आभारी आहे. यांनी सर्वांनी मला दोन वर्ष कर्नाटकाची सेवा करण्याची संधी दिली. मी कर्नाटक आणि माझ्या मतदार संघातील लोकांचे आभार मानतो. मी 2 दिवसांपूर्वीच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. राज्यपालांनी माझा राजीनामा स्वीकारला असल्याचं बी एस येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे.
कोण असेल नवा मुख्यमंत्री? कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत प्रल्हाद जोशी यांचं नाव चर्चेत आहे. जोशी हे मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. तसंच उत्तर कर्नाटकचे खासदार देखील आहेत. जोशी यांच्यानंतर बीएल संतोष यांच्या नावाचाही जोर आहे. संतोष अनेक वर्षांपासून संघटन मंत्री म्हणून काम करत असून सध्या ते भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आहेत. त्यांच्याकडे कुशल प्रशासक म्हणून पाहिलं जातं. त्याशिवाय उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, भाजप नेते मुर्गेश निराणी आणि वसवराज एतनाल यांची नावेही मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत आहेत. दरम्यान एक दोन दिवसात नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित केलं जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.