नवी दिल्ली, 6 जुलै: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Union Cabinet Expansion) केवळ चर्चांनाच नव्हे, तर हालचालींनाही जोर आल्याचं गेल्या काही तासांतील घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकुणाचा समावेश होणार आणि कुणाला मंत्रिमंडळातून निरोप दिला जाणार, याच्या जोरदार चर्चा सध्या रंगत आहेत. मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता असणाऱ्या नेत्यांना दिल्लीतून फोन येत आहेत आणि लगबगीनं वेगवेगळ्या राज्यातील संभाव्य चेहरे दिल्लीत दाखल होत आहेत. ज्योतिरादित्य सिंदिया (Jyotiraditya Scindia), नारायण राणे (Narayan Rane), सदानंद सोनोबाल (Sadanand Sonobal) यांच्यासह अऩेक चेहरे सध्या दिल्लीत दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वात लक्षवेधी आहे भाजप नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांचं. मध्यप्रदेशमधील काँग्रेसची सत्ता उलथवून पुन्हा भाजपचं राज्य आणण्यामध्ये महत्त्वाचा वाटा असलेल्या ज्योतिरादित्य यांना मंत्रीपद देऊन त्यांचा ‘योग्य तो’ सन्मान करण्याची तयारी दिल्लीत झाल्याची चाहूल लागत आहे. उज्जैनच्या महाकाल मंदिरात पूजा करून ज्योतिरादित्य सिंदियांनी थेट दिल्लीसाठी उड्डाण केल्याची माहिती ‘आज तक’नं दिली आहे. त्यांच्यासोबत जनता दलाचे नेते आरसीपी सिंग यांनादेखील दिल्लीहून फोन आल्यानंतर त्यांनी विमान पकडल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे यांनादेखील दिल्लीचं आमंत्रण आल्याची माहिती असून मोठ्या प्रतिक्षेनंतर त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनाही मोदी मंत्रीमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे. हिमांता बिस्वा यांच्यासाठी त्यांनी स्वतःची खुर्ची सोडल्यामुळे त्यांना दिल्लीत एक खुर्ची मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. तर बिहारच्या लोकजनशक्ती पक्षात फूट पाडण्यात सिंहाचा वाटा उचलणारे खासदार पशुपती पारस हे सध्या दिल्लीत असून त्यांनाही मंत्रीपदासाठी कॉल आल्याची चर्चा आहे. दिल्लीत स्वतःसाठी नवा शर्ट खरेदी करताना त्यांना याबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा ‘राज को राज रहने दो’ असं उत्तर त्यांनी दिल्याचं एनडीटीव्हीनं म्हटलं आहे. हे वाचा - मोदींचा असाही मास्टरस्ट्रोक, सेनेला डिवचत अवजड खाते राणेंना मिळणार? केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी वर्णी लागणार असल्यामुळे त्यांची जागा सध्या रिक्त होणार आहे. या जागेवर तृणमूलमधून भाजपात आलेले दिनेश द्विवेदी किंवा काँग्रेसमधून भाजपात आलेले जितीन प्रसाद यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय अपना दलच्या अनुप्रिया पटेल, पंकज चौधरी, रिटा बहुगुणा जोशी, रामशंकर कठेरिया, वरूण गांधी, लल्लन सिंग आणि राहुल कासवान ही नावंदेखील चर्चेत आहेत. आठ राज्यांचे राज्यपाल बदलणार देशातील आठ राज्यांचे राज्यपाल बदलण्याच्या प्रस्तावावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सह्या केल्या आहेत. त्यामध्ये कर्नाटक, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, मिझोरम, गोवा, त्रिपुरा, हरयाणा आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे. यातील काही जागी केंद्रीय मंत्रीमंडळातील चेहरे येणार असल्यामुळे त्या जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.