जम्मूमध्ये दहशतवाद्यांकडून हिंदूंचं टारगेट किलिंग
श्रीनगर, 2 जानेवारी : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सतत सुरुच आहेत. पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेला न जुमानता ‘टारगेट किलिंग’ केलं जातंय. हिंदू धर्माच्या व्यक्तींना पाहून छळणं, ठार करणं अशा पद्धतीच्या दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे नागरिक त्रस्त झालेत. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जम्मूमध्ये पुन्हा एक दहशतवादी कृत्य घडलं. राजौरी जिल्ह्यातल्या एका गावात दहशतवाद्यांनी हिंदूंना टारगेट करून गोळीबार केला. त्यात 4 जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. त्या संदर्भात पोलिसांनी नाकाबंदी करून शोधमोहीम सुरु केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून टारगेट किलिंग सुरु आहे. विशिष्ट समुदायाला केंद्रीत करून त्रास दिला जातोय. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच जम्मूच्या राजौरी जिल्ह्यात एक टारगेट किलिंगची घटना घडलीय. राजौरी जिल्ह्यातल्या डांगरी गावातल्या सरपंच धीरज शर्मा यांनी घटनेची माहिती दिलीय. दहशतवाद्यांनी मारण्याच्या आधी ओळखपत्र पाहिल्याचं त्यांनी सांगितलं. ओळखपत्रावरून हिंदू असलेलं पाहून त्यांनी 4 जणांना मारलं, असं त्यांनी सांगितलं. ऑनलाईन मीडिया रिपोर्ट्सही तसंच सांगताहेत. वाचा - रात्री एकाच खोलीत झोपले अन् सकाळी आढळले कुटुंबातील तिघांचे मृतदेह, त्या घरात काय घडलं? प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (1 जानेवारी 2023) संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला 2 दहशतवादी गावाच्या जवळ आले होते. गावातल्या 3 घरांवर अंदाधुंद गोळीबार करून ते पळून गेले. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हे थरारनाट्य 10 मिनिटांच्या आत संपलं. पहिले दहशतवाद्यांनी अपर डांगरीतल्या एका घरावर गोळ्या मारल्या. नंतर तिथून 25 मीटर लांब असलेल्या इतर काही लोकांवर गोळीबार केला. गावातून पळून जाण्याआधी दुसऱ्या घरापासून 25 मीटर लांब असलेल्या आणखी एका घरावर गोळीबार केला. त्यात एकूण 10 नागरिक जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांना सरकारी वैद्यकीय रुग्णालयातल्या डॉक्टरांनी मृत घोषित केलं. तसंच 3 जखमींना हेलिकॉप्टरद्वारे जम्मूमध्ये नेण्यात येत असताना त्यापैकी एकाचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये सतीश कुमार (45), दीपक कुमार (23) या वडील-मुलाचा समावेश असून प्रीतम लाल (57) आणि शिशुपाल (32) या आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. जखमी व्यक्तींमध्ये पवन कुमार (38), रोहित पंडित (27), सरोज बाला (35), रिदम शर्मा (17) आणि पवन कुमार (32) यांचा समावेश आहे. सरकारी रुग्णालयातले डॉक्टर महमूद यांनी गोळीबारामध्ये 4 लोकांचा मृत्यू झाल्याबाबत सांगितलं आहे. दहशतवाद्यांनी गावातल्या महिलांसोबत गैरवर्तनही केल्याचं सरपंचांनी सांगितलं. स्त्रियांचे केस ओढून त्यांना दहशतवाद्यांनी मारहाण केली. एका खोलीत त्यांना बंद करून त्यांच्यासमोर गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याबाबत कारवाई सुरु असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ यांच्याकडून नाकाबंदी करण्यात आली असून शोधमोहीम सुरु असल्याचं जम्मू विभागाचे अपर पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी म्हटलंय. दोन्ही दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.