सोर्स : गुगल
24 नोव्हेंबर दिल्ली : दिल्लीचं ऐतिहासिक जामा मशिद पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे आणि यावेळी कारण आहे ते मशिदीबाहेर लावले गेलेले नोटीस बोर्ड. या नोटीसनुसारा महिलांच्या एन्ट्रीला मशिदीमध्ये येण्यास बंदी आहे. ज्यामुळे देशभरात आता या मुद्दयावर चर्चा रंगली आहे. मशिदिच्या तिन्ही प्रवेशद्वारांवर एक नोटीस बोर्ड लावला गेला आहे, ज्यामध्ये “जामा मशिदीत एकट्या मुलीला किंवा मुलींना प्रवेश देण्यास मनाई आहे. म्हणजेच मुलीसोबत पुरुष पालक किंवा नवरा नसेल तर त्यांना मशिदीत प्रवेश मिळणार नाही.’’ मशिदीच्या आवारातील अश्लीलता थांबवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं सांगितलं जातंय, पण आता यावरुन चांगलाच वाद पेटला असल्याचं दिसत आहे. दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी इमाम यांना नोटीस बजावण्याच्या मुद्द्यावरून टीका केली आहे.
मशिदींमध्ये महिलांना का बंदी घातली गेली? जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी कारण देत सांगितलं की ‘मुली आपल्या प्रियकरासोबत मशिदीत येतात, अशा तक्रारी होत्या. त्यामुळे अशा मुलींच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. शाही इमाम म्हणाले की, जर एखाद्या महिलेला जामा मशिदीमध्ये यायचे असेल तर तिला कुटुंब किंवा पतीसोबत यावे लागेल.’ या घटनेबद्दल दिल्लीचे एलजी व्ही.के.सक्सेना यांनी जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी महिलांच्या प्रवेश बंदीवरचे निर्बंध रद्द करण्याची विनंती केली. इमाम बुखारी यांनी यासाठी सहमती दर्शविली आहे. मात्र त्यांनी मुस्लिम बांधवांना विनंती देखील केली आहे की, त्यांनी मशिदीचा आदर करावा आणि त्याची पवित्रता राखावी.
पण या सगळ्यात असा प्रश्न उपस्थीत राहातो की इस्लाम काय सांगतो, खरंच इस्लामनुसार महिलांना मशिदींमध्ये प्रवेश बंदी आहे? बहुतेक मुस्लिम धर्मगुरूंच्या मते, इस्लाममध्ये इबादतसाठी स्त्री-पुरुष असा भेद केला जात नाही. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही इबादत करण्याचा अधिकार आहे. तसेच मक्का, मदीनातही महिलांना प्रवेशबंदी नाही. मात्र, असं असलं तरी देखील भारतात असे अनेक मशिदीं आहेत, ज्यांमध्ये महिलांना प्रवेशबंदी आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील करण्यात आली आहे. ही याचिका पुण्यातील यास्मिन पिरजादे आणि जुबैर पिरजादे या मुस्लिम दाम्पत्याने दाखल केला आहे. देशभरातील मशिदींमध्ये महिलांना प्रवेशबंदी करणे ‘घटनाबाह्य’ असल्याने त्यांना मशिदीत प्रवेश देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
या नियमाबद्दल कायदा काय सांगतो? जानेवारी 2020 मध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, इस्लामने महिलांना मशिदीत येण्यास किंवा नमाज पठण करण्यास मनाई केलेली नाही. मात्र, इस्लाममध्ये शुक्रवार किंवा जुम्याच्या नमाजला महिलांची उपस्थित आवश्यक नसल्याचे सांगितले आणि यासाठी मशिदीचे बोर्ड कोणतेही नियम लादू शकत नाही, असेही त्यात म्हटले आहे. बहुतांश मुस्लिम धर्मगुरूही मशिदीत महिलांना प्रवेश देण्याला पाठिंबा देतात. काही वर्षांपूर्वी मशिदीत महिलांच्या प्रवेशाचा मुद्दा चर्चेत असताना सुन्नी, सुप्रसिद्ध धर्मगुरू मौलाना खालिद रशीद महाली यांनी इस्लाममध्ये मशिदींमध्ये महिलांना नमाज पठण करण्याची परवानगी मिळते, असे म्हटले आहे ‘मशिदींमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम महिला नमाज पठण करतात. मात्र, मासिक पाळीच्या काळात महिला मशिदीत येऊ शकत नाहीत, असेही त्यांनी सांगितले आहे.