चंदीगड 16 मार्च : काही दिवसांपूर्वीच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला (Assembly Election Result 2022). यात पंजाबचाही समावेश आहे. पंजाबमध्ये आपला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. अशात आता आम आदमी पार्टीचे नेता भगवंत मान (Bhagwant Man) सात वर्षांपासून वेगळ्या राहाणाऱ्या एका पिता-पुत्राच्या पुनर्मिलनाचं कारण बनले आहेत. विशेष बाब म्हणजे मान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भगतसिंग यांचं गाव असलेल्या खटकर कलानमध्ये सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याच कारणामुळे हे पिता-पुत्र परत एकत्र आले.
फरीदकोट जिल्ह्यातील रहिवासी देविंदर सिंग यांचा मुलगा जसविंदर सिंग सात वर्षांपूर्वी घरातून पळून गेला होता. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्याचा शोध लागला नाही. यानंतर पोलीस ठाण्यात तो हरवल्याची नोंद करण्यात आली. अलीकडेच देविंदर यांचा मुलगा शपथविधी स्थळी खुर्च्या लावताना दिसला. पंजाब हे सीमावर्ती राज्य आहे. जिथे पाकिस्तान अनेकदा ड्रोन आणि इतर कारवायांमुळे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतं. अशा परिस्थितीत पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं गांभीर्य ओळखून पोलीस पडताळणीसाठी प्रत्येक व्यक्तीची माहिती गोळा करत होते आणि यादरम्यान जसविंदरची खरी ओळख समोर आली. नवांशहर पोलीस ठाण्याचे एएसआय बलविंदर सिंग यांनी त्याच्या घरी चौकशी केली असता त्यांचा मुलगा सात वर्षांपूर्वी घरातून निघून गेल्याचं समजलं.
पोलिसांनी जसविंदर याठिकाणी असल्याची माहिती देताच कुटुंबीय खटकर कलान येथे पोहोचले आणि त्यांची मुलासोबत भेट झाली. देविंदर स्वतः आपल्या मुलाला घेण्यासाठी कार्यक्रमस्थळी आले आणि त्यांनी पोलिसांचे आभार मानले. जसविंदर सिंगने सांगितलं की, गेल्या पाच दिवसांपासून तो कार्यक्रमस्थळी काम करत असे. त्यापूर्वी तो क्रोकरीचे काम करायचा. काही कारणांने राग आल्याने मी घर सोडलं होतं, असंही त्याने सांगितलं.