नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी: शनिवारी सकाळी काश्मीर, दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR) आणि इतर भागात भूकंपाचे धक्के जाणवले.जम्मू-काश्मीरमधील काश्मीर खोरे आणि जम्मू विभागात भूकंपाचे (earthquake) जोरदार धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर पडले. लोकांच्या म्हणण्यानुसार, जमीन खूप वेगानं हादरली, त्यामुळे सगळे घाबरले. यापूर्वी 14 जानेवारीला जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. आज सकाळी 9.45 वाजता अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमा भागात 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याचं सांगण्यात येत आहे. भूकंपाची खोली 210 किमी होती. भूकंपामुळे जीवित आणि मालमत्तेला कोणताही धोका झाल्याचे वृत्त नाही. यापूर्वी 14 जानेवारीला जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.3 इतकी होती. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमेवर असल्याचं सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानातील पेशावरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. जिओ न्यूजनुसार, इस्लामाबाद, रावळपिंडी आणि पंजाब आणि खैबर पख्तूनख्वामधील इतर अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. गेल्या महिन्यात अफगाणिस्तानच्या पश्चिमेला असलेल्या बादघिस प्रांतातही भूकंप झाला होता. या भूकंपामुळे 26 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. भारतात सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यापूर्वी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी 3.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. रापर गावात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. गांधीनगर स्थित इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मिक रिसर्च (ISR) ने सांगितले की, ‘शुक्रवारी सकाळी 10.16 वाजता कच्छच्या रापरमध्ये 3.1 तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला. भूकंपाचा केंद्रबिंदू भूपृष्ठापासून 19.1 किमी खोलीवर होता. काश्मीर हा डोंगराळ भाग आहे. त्यामुळे येथे भूकंपाचा धोका नेहमीच असतो. या भागात मोठा भूकंप होऊ शकतो, असंही तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत लोकांमध्ये नेहमीच भीतीचं वातावरण असते. एक छोटासा भूकंपही लोकांना घाबरवण्यासाठी पुरेसा असतो.