रायपूर 19 फेब्रुवारी : छत्तीसगडमधल्या (Chhattisgarh) दुर्ग जिल्ह्यातील (Durg District) शासकीय जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी एका महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया (Surgery) करून तिचा जीव वाचवला. विशेष म्हणजे या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यास अनेक रुग्णालयांनी नकार दिला होता. दुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अशी गंभीर स्वरुपाची केस बरी करण्याची जबाबदारी स्वीकारली. डॉक्टरांनी समर्पण भावनेतून उपचार केल्याने ही महिला आता आजारातून पूर्णपणे बरी झाली आहे. या महिलेच्या पोटात सुमारे तीन किलोग्रॅम वजनाची फुटबॉलसारखी दिसणारी गाठ (Tumor) होती. दुर्ग येथे राहणाऱ्या ममता निषाद या ट्यूमरच्या उपचारांसाठी गेल्या दोन वर्षांपासून भटकंती करत होत्या. या ट्यूमरमुळे होणाऱ्या तीव्र वेदना (Pains) त्यांना असहाय्य होत होत्या. मात्र आता यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सुधारत आहे. प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाल्यास लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.
ममता निषाद यांनी सांगितलं की, ``मी एक-दोन नव्हे तर अनेक रुग्णालयांमध्ये फेऱ्या मारल्या, पण उपचार तर सोडाच पण डॉक्टरांना माझ्या आजाराचं नेमकं निदानही करता आलं नाही.`` शेवटी हार पत्करून ही महिला दुर्ग जिल्हा रुग्णालयात (Durg District Hospital) पोहोचली असता डॉक्टरांनी या महिलेवर समर्पण भावनेतून उपचार केले आणि यशस्वी ऑपरेशन करून तिचे प्राण वाचवले आहेत. ``माझ्या पोटात असहाय्य वेदना होत होत्या. प्रमाणापेक्षा अधिक रक्तस्त्राव (Bleeding) होत असे. गेल्या दोन वर्षांपासून मी हा त्रास सहन करत होते. शरीरात केवळ दोन ते अडीच ग्रॅम हिमोग्लोबीन (Hemoglobin) शिल्लक होतं. या स्थितीत मी या रुग्णालयात दाखल झाले``, असं ममता निषाद यांनी सांगितलं.
4 डॉक्टरांच्या पथकाने 3 तास केली शस्त्रक्रिया गायनॅकोलॉजिस्ट डॉ. स्मिता यांनी सांगितले की, `या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून, तिच्या पोटातून सुमारे तीन किलोची गाठ काढण्यात आली.`` सीएचसी विभाग प्रमुख डॉ. बी.आर. साहू म्हणाले की, ``सुमारे 3 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत डॉक्टरांसह 4 जणांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. आज शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यावर जणू त्यांचा सगळा थकवा दूर झाला आहे, असं वाटतं.`` दुर्ग जिल्हा रुग्णालयाने ही यशस्वी शस्त्रक्रिया करून उपचारांच्या अनुषंगाने टीका करणाऱ्यांची तोंडं बंद केली आहेत. जर या महिलेच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली तर, तिला चार दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.